उल्हासनगर : बोरिवली येथून अपहरण झालेल्या ५ वर्षीय मुलाची उल्हासनगर पोलिसांनी शहाड फाटक उड्डाण पुल परिसरातून बुधवारी रात्री सुटका केली. तसेच अटक केलेल्या दोन अपहरणकर्ते आरोपीसह मुलाला बोरिवली रेल्वे पोलीसांच्या ताब्यात दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे यांनी दिली आहे.
उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे यांना बोरीवली येथून अपहरण झालेला ५ वर्षाचा मुलगा व अपहरणकर्ते शहाड रेल्वे फाटक उड्डाणपूल परिसरात असल्याची माहिती बुधवारी मिळाली. ताम्हणे यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रणजित भालके व बिट मार्शल पोलीस पी डी रुपवते व राम पाटिल यांनी शोध घेतला असता, ५ वर्षाच्या मुलाला घेऊन दोन इसम संशयितरीत्या उभे दिसलें. त्यांनी त्यांना ताब्यात घेऊन बोलते केल्यावर, खरा प्रकार उघड झाला. बोरिवली येथे राहणारे कृष्णा गुप्ता यांच्या ५ वर्षीय मुलांचे मंगळवारी गोरेगाव रेल्वे स्थानकातून अपहरण झाले होते. या प्रकरणातील गुन्ह्याच्या तपासात संबंधित अपहरण झालेले बालक शहाड रेल्वे स्थानकाजावळ असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली.
उल्हासनगर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी शहाड फाटक व उड्डाणपूल परिसरात शोध मोहीम राबवून संशयितरीत्या असलेल्या दोन इसमासह ५ वर्षाच्या मुलाला ताब्यात घेऊन बोलते केले. तेंव्हा सर्व प्रकार उघड झाला. अपहरण झालेल्या मुलासह अपहरणकर्ते करणकुमार रामथिरण कनोजीया व धरमपाल रामकिशोर यादव यांना अटक करून उल्हासनगर पोलीस ठाण्यात आणले. अपहरण करणारे हे मुलाच्या वडिलांचे मित्र असल्याचे उघड झाले असून पैशासाठी अपहरण केल्याचे बोलले जाते. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे यांनी बोरिवली रेल्वे पोलिसा सोबत संपर्क करून, अपहरण झालेले बालक व अपहरणकर्ते यांना अटक केल्याची माहिती देऊन बोलावून घेतले. बुधवारी रात्री उशिरा अपहरण झालेल्या मुलासह अपहरणकर्ते यांना बोरिवली पोलिसांच्या ताब्यात दिले. उल्हासनगर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.