लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर : शहरातील वनिता लखमीचंद कुकरेजा यांना व्हाट्सअप चॅटिंग करणे महागात पडले असून त्यांची १० लाख ८ हजाराची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात डोनल्ड व राकेश शर्मा नावाच्या इसमावर गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात राहणाऱ्या वनिता कुकरेजा यांचे रोनल्ड नावाच्या इंग्लंड येथिल मित्रा सोबत व्हाट्सअपवर चॅटिंग होत होते. एके दिवसी रोनल्ड नावाच्या मित्राने भेटण्यासाठी भारतात येत असल्याचे सांगितले. दरम्यान २१ ते २३ नोव्हेंबर रोजी राकेश शर्मा नावाच्या इसमाचा फोन येऊन, त्याने एअरपोर्ट येथील कस्टम अधिकारी असल्याची ओळख सांगून मित्र रोनल्ड विनाकागदपत्र भारतात आल्याचे सांगितले. त्याप्रकरणी रोनाल्डसह वनिता कुकरेजा यांच्यावर मनीलॉंड्रीन्गचा गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. यातून बाहेर येण्यासाठी विविध बँक खात्यात पैसे पाठविण्यास सांगितले. वनिता यांनी भीतीपोटी १० लाख ८ हजार १०० रुपये ऑनलाईन पाठविले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे उघड झाल्यावर, त्यांनी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.
मध्यवर्ती पोलिसांनी घटनेचे गांभीर्य बघून अज्ञात रोनल्ड व राकेश शर्मा यांच्या विरोधात ऑनलाईन फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. तसेच अश्या ऑनलाईन चॅटिंग व खोटे मोबाईल कॉल, ऑनलाईन जुगार यापासून नागरिकांनी सावध रहा. असे आवाहन पोलिसांनी केले असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.