मुरलीधर भवार, लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वासदर्शक ठराव, विधिमंडळ अध्यक्षांची निवड, विधान परिषद सदस्यांची निवड, राज्यसभा आणि राष्ट्रपती निवडणूक, असा पाचवेळा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्याच पाटील यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची जबाबदारी सोमवारी सोपवली.
त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील सुमारे लाख ते सव्वालाख मनसेची मते महायुतीच्या उमेदवाराच्या पारड्यात पडतील, याची जबाबदारी पाटील यांच्यावर आली आहे. मोदी यांना दिलेला राज ठाकरे यांचा हा पहिला नव्हे, तर सहावा पाठिंबा आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव निश्चित आहे, तर महाविकास आघाडीतर्फे उद्धव सेनेच्या उमेदवार वैशाली दरेकर या निवडणूक रिंगणात उभ्या आहेत. मनसेत असताना, त्यांनी २००९ साली कल्याण लोकसभेतून निवडणूक लढविली होती. त्यांना १ लाख २ हजार मते मिळाली होती. दरेकर यांनी उमेदवारी दाखल केल्यावरच मनसे आमदार राजू पाटील यांनी गद्दारांना माफी नाही, असे सांगत त्यांची भूमिका स्पष्ट केली होती.
आ. पाटील यांच्यावर कल्याण लोकसभेची जबाबदारी साेपविल्यानंतर मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची लवकरच एक बैठक घेतली जाणार आहे. त्याची एक कार्यकारिणी तयार केली जाणार आहे. राज ठाकरे यांची मुंबईत एक सभा होणार आहे. मात्र, कल्याण, ठाणे, भिवंडी, पालघर लोकसभा मतदारसंघांतील सभेचे अद्याप नियोजन नाही.
२००९ साली विधानसभेला मनसेचे उमेदवार रमेश पाटील यांना ५१,१४९ मते मिळाली व ते विजयी झाले होते तर त्यांनी २०१४ साली निवडणूक लढविली, तेव्हा त्यांना ३९,८९८ मते मिळाली व त्यांचा पराभव झाला. २०१९ साली मनसेचे उमेदवार राजू पाटील यांनी निवडणूक लढविली. त्यांना ९३,९२७ मते मिळाली व ते विजयी झाले. मनसेची किती मते ते महायुतीच्या उमेदवाराला ट्रान्सफर करण्यात यशस्वी होतात, याकडे लक्ष लागले आहे.