MNS Raj Thackeray ( Marathi News ) :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त काल मुंबईतील शिवाजी पार्क इथं सभा घेत लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर केली. नरेंद्र मोदींसाठी आम्ही भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं राज यांनी जाहीर केलं. राज ठाकरेंच्या या भूमिकेचं मनसैनिकांनी स्वागत केलं. मात्र त्यांची ही भूमिका न पटल्याने मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. या पार्श्वभूमीवर मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू ऊर्फ प्रमोद पाटील हे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पाटील यांनी काही वेळापूर्वीच एक्सवर सविस्तर पोस्ट लिहीत आपली भूमिका मांडली आहे.
"आपला देश विकसनशील ते विकसित अशा संक्रमण अवस्थेतून जात असताना देशात नेतृत्व बदल होणे परवडण्यासारखं नाही आणि समजा जरी धोका पत्करायचा म्हटला तरी पर्याय कोण आहे ? यांना पराभूत करून जिंकून कोणाला देणार आहोत?" असा सवाल करत राजू पाटील यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं ठामपणे समर्थन केलं आहे. ऊंच झेप घेण्यासाठी चित्ता दोन पावलं मागे येतो, असंही पाटील म्हणाले.
राजू पाटील यांची पोस्ट जशीच्या तशी...
"कालच्या साहेबांच्या भाषणानंतर बऱ्यापैकी शंका कुशंकांचं मळभ दूर झालं असावं. खरंतर साहेबांनी आपल्या भाषणात सांगितल्याप्रमाणे अंदाज बांधणाऱ्या लोकांनी कल्पनांचे इमले इतके भयानक आणि अतर्क्य बांधले होते की विचारता सोय नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून पक्षाची धुरा वाहताना भूमिका मांडणं हे सोशल मीडियावर कुणाच्या तरी वॉलवर जाऊन आपली मतं मांडण्याइतकं (टर उडवण्याइतकं) सोपं नसतं. भूमिका ठरायला वेळ लागतो, विचारविनिमय करावा लागतो, भविष्यातील वाटचालींचा अंदाज घ्यावा लागतो.
महाराष्ट्रातील एकूण राजकीय परिस्थितीबद्दल अत्यंत स्पष्ट शब्दांत सन्माननीय राजसाहेबांच्या शैलीत खरपूस समाचार घेतला गेला आहेच. परंतु आगामी निवडणुका या अखंड हिंदुस्थानच्या भविष्याची वाट ठरवणाऱ्या निवडणुका आहेत. विशेषतः आपला देश विकसनशील ते विकसित अशा संक्रमण अवस्थेतून जात असताना देशात नेतृत्व बदल होणे परवडण्यासारखं नाही. (आणि समजा जरी धोका पत्करायचा म्हटला तरी पर्याय कोण आहे ?) यांना पराभूत करून जिंकून कोणाला देणार आहोत? आमच्या आगरी भाषेत म्हण आहे ‘खायाची मोत, पुन मिशीला तेल’ अशी मोदींच्या विरोधकांची अवस्था. यांच्या नेतृत्वात आपल्या देशाचं काय भलं होणार? शिवाय मोदींच्या कणखर निर्णयांनी देशाची प्रतिमा उजळली आहे, हे मी जेव्हा परदेशात गेलो होतो तेव्हा स्वतः अनुभवलं आहे. खिळखिळी अर्थव्यवस्था ते पहिल्या पाचात जाऊ शकणारी अर्थव्यवस्था, ३७० कलम रद्द करणे आणि माझ्या वैयक्तिक इच्छेतलं सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे राम मंदिराचे निर्माण, देशातील डिजिटल क्रांती अशा अनेक गोष्टी विचारात घेतल्याच पाहिजेत. सन्माननीय राज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे वाईट आहे त्यावर कोरडे ओढाच, पण चांगलं आहे त्याचं कौतुक करण्याची सर्वच राजकारण्यांनी सवय घ्यायला हवी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हिताची आणि अस्मितेची बाजू उंचावणारा पक्ष आहेच पण सवाल जेव्हा देशाचा येतो तेव्हा प्राथमिकता हिंदुस्थानच असणार ना. शिवाय आम्हा सर्व मनसैनिकांच्या आवडत्या शैलीत बोट उंचावून साहेबांनी सांगितलंच आहे.....विधानसभेच्या तयारीला लागा. शेवटचं पण महत्वाचं सांगतो. ‘उंची छलांग लगाने के लिये चिता भी दो कदम पीछे आता है |"