डोंबिवली: कसारा रेल्वे स्थानकातील सर्व चार प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. कसारा रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार असून, आणखी एका पादचारी पुलासह, तीन लिफ्ट व सहा एक्सलेटर, पार्किंग, नवे रेल्वे तिकिट बुकिंग ऑफिस आणि विविध सुविधा दिल्या जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.
मध्य रेल्वेवरील कसारा रेल्वे स्थानकातील सर्वच्या सर्व चार प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या ६ मीटर रुंद व २३९ मीटर लांबीच्या प्रशस्त पादचारी पुलाचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ नेते दशरथ तिवरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, अशोक इरनक, विनायक सावंत, सरपंच प्रकाश वीर, उपसरपंच शरद वेखंडे, स्टेशन मास्तर विजय लकरा आदींसह प्रवाशांची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने रेल्वे मंत्रालयाला विक्रमी निधी दिल्यामुळे रेल्वेची कामे सुरू असून, रेल्वे स्थानकांचा लवकरच कायापालट होईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. कसारा रेल्वे स्थानकात उभारलेल्या या पुलामुळे प्रवाशांना रेल्वेमार्ग ओलांडण्याची गरज लागणार नाही. यापुढील काळात आणखी एक पादचारी पूल, ८० मोटारी व ८ बस उभ्या राहतील एवढे प्रशस्त पार्किंग, तीन लिफ्ट, सहा सरकते जिने (एक्सलेटर), रेल्वे तिकिट बुकिंग ऑफिस आदींसह विविध सुविधा उभारल्या जाणार आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने रेल्वे मंत्रालयाला २ लाख ४० हजार कोटींचा विक्रमी निधी मंजूर केला. या निधीतून रेल्वेच्या विकासकामांचा वेग वाढण्याबरोबरच रेल्वेगाड्यांचाही वेग वाढेल. सध्या वंदे भारत ही ट्रेन १३० किलोमीटर वेगाने धावत आहे. यापुढील काळात ताशी २०० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या गाड्यांसाठी कामे करण्यात येत आहेत, असे श्री. पाटील यांनी सांगितले.
राज्यातील नव्या युती सरकारने रेल्वेच्या कामांसाठी राज्य सरकारकडून हिस्सा दिला जाणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे एमआरव्हीसीमार्फत होणाऱ्या रेल्वेच्या विविध कामांना वेग येईल. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुरबाड रेल्वेची प्रक्रिया रखडली होती. मात्र, राज्यात सत्तेवर आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या दिवशी प्रकल्पातील ५० टक्के निधीसाठी हमी दिल्यामुळे मुरबाड रेल्वे मंजूर झाली, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.