सचिन सागरे
कल्याण : भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभाग आणि महाराष्ट्र फेडरेशनच्या वतीने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ६० रुपये किलो दराने भारत डाळच्या नावाने चणाडाळ विक्रिचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कल्याणमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचे कल्याण पश्चिम मंडळ अध्यक्ष वरुण पाटील यांच्यावतीने पश्चिमेतील पारनाका आणि साई चौक याठिकाणी या उपक्रमाचे आयोजन केले असून केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याहस्ते या केंद्राचे उद्घाटन करत नागरिकांना स्वस्त दरात डाळ वितरित करण्यात आली. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, कल्याण पश्चिम मंडळ अध्यक्ष वरुण पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे, अर्जुन म्हात्रे, अर्जुन भोईर, भगवान म्हात्रे, सुधीर वायले, शत्रुघ्न भोईर, माजी नगरसेवक दया गायकवाड, सुहास चौधरी, रोहिदास गायकर, अजय पवार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अल्प दरात चणाडाळ उपलब्ध करण्याचा संकल्प केला आणि त्याचे वाटप याठिकाणी सुरू झाले आहे. २०१४ साली प्रधानमंत्र्यांनी पहिल्यांदा शपथ घेतली तेव्हा त्यांनी गरिबांच्या प्रती आपले सरकार समर्पित असून आपण प्रधानमंत्री नसून प्रधानसेवक असल्याचे जाहीर केले होते. हाच संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कोरोनाकाळ असेल किंवा त्यानंतरची परिस्थिती, देशातील ८० कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशात झालं.
आता दिवाळीचा सण आला असून प्रत्येक कुटुंबात चणा डाळ अतिशय उपयुक्त आहे. बाजरभाव १२० रुपये किलो असताना ६० रुपये किलो दराने हि डाळ उपलब्ध करण्यात आली असून एका व्यक्तीला ५ किलो चणाडाळ घेता येणार आहे. अल्प दरात डाळ उपलब्ध करून जनतेची आनंदाची दिवाळी करण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. राज्य सरकारने देखील आनंदाच्या शिधाच्या माध्यमातून नागरिकांना दिवाळीसाठी उपयुक्त वस्तु देण्यात येणार आहे यामुळे नागरिकांची दिवाळी आणखी आनंदमय होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.