- अनिकेत घमंडी
डोंबिवली: डोंबिवली वूमेनस् वेलफेअर सोसायटीने चौदा वर्षांखालील लहान मुलींचा ब्रिलीयन्ट बटरफ्लाईज क्लब हा गट स्थापन केला असून त्या गटाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे. राज्यातील १ हजार गणेशभक्तांना त्यांच्या घरातील निर्माल्य संकलित करण्यासाठी प्लास्टिक ऐवजी कागदी पिशव्यांचा विनामूल्य पुरवठा करण्याचा संकल्प।केला आहे.
डोंबिवलीतून त्याची सुरुवात झाली, असून बुधवारी गणेश जयंतीच्या शुभारंभाला १०० नागरिकांना त्यांनी पेपर पिशव्या वितरित केल्या. दहा दिवसांत एक हजार पिशव्यांचे वितरण करण्याचा संस्थेचा संकल्प असल्याचे अध्यक्षा डॉ. स्वाती गाडगीळ यांनी सांगितले. त्या गटाच्या स्थापने संदर्भात त्यांनी सांगितले की, मुलींना निरनिराळ्या उपक्रमांद्वारे आत्मबळ, आत्मविश्वास, आत्मसन्मान या त्रिसुत्रीचे महत्त्व पटवून सांगणे. यंदा या गटाला पहिल्याच गणेशोत्सवात त्यांना निर्माल्य पेपर बॅग्स हा उपक्रम दिला. अडीच वर्ष ते १४ वर्षा पर्यंतच्या मुलींनी खूप उत्साहाने जुन्या वर्तमानपत्रांपासून या कागदी पिशव्या बनवल्या.
लहान मुलींनी आईची मदत घेतली. घरोघरी आणि बाजारात फुलविक्रेत्यांकडे येणार्यांना दिल्या. कल्याण, डोंबिवली, पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी अशा ठिकाणी या गटाच्या सदस्य राहतात आणि अशा प्रकारे आपला हा संदेश महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पोहोचला आहे व अनंत चतुर्दशी पर्यंत हे कार्य सुरू राहणार असल्याचे त्या म्हणाल्या. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा हा संदेश त्या लहान मुलींनी दिला असून त्यांचे गावागावात ज्येष्ठांकडून कौतुक होत आहे याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी, दररोज किमान शंभर कागदी पिशव्या वाटण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.