कल्याण: कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर महापालिका आणि अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्यासाठी एकत्रित परिवहन सेवा स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर केएमपीएमएल (कल्याण महानगर परिवहन महामंडळ) स्थापन केले आहे. दरम्यान याचे स्वागत करताना जोपर्यंत कर्मचा-यांना जूनी पेन्शन योजना लागू होत नाही तसेच पाचवा,सहावा तसेच सातव्या वेतन आयोगाची पूर्ण थकबाकी मिळत नाही तोपर्यंत तोपर्यंत ‘केएमपीएमएल’ ला विरोध राहील असे पत्र महापालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने मनपा आयुक्त डॉ इंदु राणी जाखडं यांना दिले आहे.
केडीएमटी परिवहन उपक्रम हा १९९९ ला चालू झाला. २४ वर्षे उपक्रमात अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत. त्यांना जूनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासन आणि मुंबई उच्च न्यायालयाने आदेशीत करून देखील निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे निवृत्त तसेच मृत पेन्शन कर्मचा-यांना फारच कमी पेन्शन मिळत असल्याने आजच्या महागाईच्या काळात खुप हलाखीचे जीवन कर्मचा-यांना जगावे लागत असल्याकडे महापालिका कामगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेश पाटील यांनी लक्ष वेधले आहे. महापालिकेतील कर्मचा-यांप्रमाणे संबंधितांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे जुनी पेन्शन लावण्यात यावी तसेच परिवहन उपक्रमाकडे कर्मचा-यांची पाचवा, सहावा व सातव्या वेतनाची थकबाकी आहे अशी अतिमहत्वाची देणी प्रशासनाकडे बाकी आहेत. या बाबी जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत केएमपीएमएल ला विरोध राहणार असा इशारा पाटील यांनी दिला आहे.