सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-५, नेताजी चौकातील न्यु इंग्लिश स्कुलने वाढ केलेली शैक्षणिक शुल्क कमी करण्याची मागणी मनसेसह अन्य संघटनेने केली होती. अखेर बुधवारी दुपारी मनसेच्या मोजक्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत शाळेच्या काचाची तोडफोड करून नामफलकाला काळे फासण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी मनसेच्या काही कार्यकर्त्याना ताब्यात घेतले आहे.
उल्हासनगर नेताजी चौकात न्यु इंग्लिश शाळा असुन शाळेत हजारो मुले शिक्षण घेत आहेत. शाळेने दुप्पट शैक्षणिक शुल्कात वाढ केल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकार्यांनी करून शैक्षणिक शुल्क कमी करण्याची मागणी शाळा प्रशासनाकडे १५ दिवसांपूर्वी केली होती. तसेच आमदार गणपत गायकवाड यांनीही शैक्षणिक शुल्क कमी करण्याची मागणी करून, त्यांच्या पदाधिकार्यांनी शुल्क कमी करण्यासाठी गेल्या १५ दिवसापासून शाळेंसमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान मनसेच्या मोजक्या पदाधिकार्यांनी घोषणा देत शाळेच्या नामफलकाला काळे फासून, शाळेच्या कार्यालयाच्या काचा फोडून टाकल्या. तसेच घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. काही वेळानी हिललाईन पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. शाळेचा खर्च बघूनच फी वाढविल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.