कल्याण : कल्याण डोंबिवलीतील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार आहे. सायंकाळी ५ वाजता कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रोजनजीक असलेल्या यशवंतराव चव्हाण मैदाना जाहीर कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता पार पडणार आहे. कल्याणमधील प्रेक्षणीय स्थळ असलेल्या काळा तलावाचे सुशोभिकरण स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात आले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
काळा तलावाचे काम स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात येणार असून त्यावर १७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पात बाधित झालेल्याना बीएसयूपी योजनेतील घरे वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोब आंबिवली आणि वाडेघर येथील मलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण करण्यात येणार आहे. काळा तलाव व्यतिरिक्त अन्य विकास कामांचे लोकार्पण सभेच्या ठिकाणाहून ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील, मंत्री रविंद्र चव्हाण, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, गणपत गायकवाड, राजू पाटील आादी मान्यवरांसह स्मार्ट सिटी प्रकल्पाचे प्रधान सचिव संजीव जायस्वाल उपस्थित राहणार आहे.
मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यासाठी करण्यात येणारी रोषणाई, खुर्च्या मंडप याकरीता महापालिकेने निविदा मागविली आहे. तसेच मुख्यमंत्री ज्या मार्गावरुन येणार त्याठिकाणी रस्ते डागडुजी आणि डांबरीकरणाची कामे सुरु आहेत. मुख्यमंत्री येणार असल्याने महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आज मुख्यालयात पोलिस प्रशासन, आरटीओ, महापालिका अधिकारी, आमदार भोईर यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी रवी पाटील, दीपेश म्हात्रे आदी उपस्थित होते.