ठळक मुद्देभाजपचे कल्याण ग्रामीणमधील महेश पाटील, त्यांच्या भगिनी डॉ. सुनीता पाटील आणि सायली विचारे तिन्ही माजी नगरसेवकांसह मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
ठाणे - आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये स्थानिक नेतेमंडळींना आपल्याकडे ओढण्याची स्पर्धा लागली आहे. शिवसेनेकडूनही दुखावलेल्या आणि इतर पक्षांतील नेत्यांना शिवबंधन बांधण्यात येत आहे. त्यातूनच, केडीएमसीच्या आगामी निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने प्रतिस्पर्धी मनसेला धक्का दिला आहे. भाजपाच्या तीन माजी नगरसेवकांनी शिवबंधन हाती बांधळे. यावेळी, भाषण करताना महेश पाटील यांची चूक झाली, ही चूक खासदार श्रीकांत शिंदेंनी सुधारली अन् एकच हशा पिकला.
भाजपच्या मातब्बर माजी नगरसेवकांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी 22 नोव्हेंबर रोजी आपापल्या पक्षांना सोडचिठ्ठी देत हाती शिवबंधन बांधले. नगरविकास मंत्रीएकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमूख उपस्थितीत मुंबईत हा पक्ष प्रवेश झाला. भाजपचे कल्याण ग्रामीणमधील महेश पाटील, त्यांच्या भगिनी डॉ. सुनीता पाटील आणि सायली विचारे तिन्ही माजी नगरसेवकांसह मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी, भाषण करताना महेश पाटील यांच्याकडून चूक झाली. मी आज भाजपात प्रवेश करतोय, असं महेश पाटील म्हणाल्याने सगळेच अवाक् झाले होते. मात्र, तात्काळ खासदार श्रीकांत शिंदेंनी त्यांना आठवण करुन दिली अन् बाजूलाच बसलेल्या मंत्री एकनाथ शिंदेंना हसूच आवरले नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. “श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात जी विकासकामं सुरु आहेत, तसंच एकनाथ शिंदे यांची कार्यकर्त्यांसोबत काम करण्याची जी पद्धत आहे. त्यामुळे भारावून जात मी स्वत: आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे,” असं महेश पाटील म्हणाले. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी त्यांना शिवसेना अशी आठवण करुन दिली. मग, सवय सूटत नाही, असे म्हणत पाटील यांनी चूक सुधारली. यावेळी एकनाथ शिंदेंसह सर्वचजण खळखळून हसले.
दरम्यान, आगामी केडीएमसी निवडणुकीची प्रत्यक्ष रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेने भाजप आणि मनसे या आपल्या प्रतिस्पर्ध्यावर धक्कातंत्राद्वारे एक पाऊल पुढे टाकले आहे.