ठाणे - कल्याण ग्रामीणचे माजी शिवसेना तालुकाप्रमुख आणि विद्यमान विधानसभा संघटक एकनाथ पाटील हे आपल्या सुनेच्या तोंडावर थुंकले व त्यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली, अशी तक्रार हर्षदा पाटील यांनी भाजप आमदारासोबत पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन केली. या घटनेची व्हिडिओ क्लिप पुरावा म्हणून त्यांनी सादर केला. सासरे एकनाथ पाटील यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणात भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनीही उडी घेतली असून कारवाईची मागणी केली आहे. तर, सासऱ्यानेही व्हिडिओचे स्पष्टीकरण दिले आहे.
कल्याण ग्रामीण परिसरातील भोपर गावात राहणाऱ्या हर्षदा या एकनाथ पाटील यांच्या सूनबाई आहेत. सासरे वारंवार त्रास देतात, शिवीगाळ व मारहाण करतात, इतकेच नाही, तर हर्षदा यांच्या मुलीच्या अंगावरही धावून जातात, असे त्यांचे म्हणणे आहे. एकनाथ हे हर्षदा यांच्या तोंडावर थुंकल्याचा त्यांचा आरोप असून, पुराव्यादाखल त्यांनी व्हिडिओ दाखवला. सासऱ्याकडून होत असलेल्या त्रासाची माहिती शिवसेनेच्या नेत्यांना सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यात यश आले नाही, असे हर्षदा यांचे म्हणणे आहे.
पोलीसही एकनाथ यांच्याविरोधात तक्रार दाखल करून घेत नसल्याने अखेरीस हर्षदा यांनी डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे दाद मागितली. चव्हाण यांनी भाजप नगरसेविका रविना माळी यांच्यासह हर्षदा यांना पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याकडे पाठवले. हर्षदा पाटील यांची सादर केलेल्या व्हिडिओची सत्यता पडताळून कारवाई केली जाईल, असे पानसरे यांनी सांगितले. विशेष म्हणजे चित्रा वाघ यांनीही ट्विट करुन व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, पोलिसांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता विकृतांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
तो व्हिडिओ दोन वर्षापूर्वीचा
सून हर्षदा ज्या व्हिडिओचा दाखला देत आहेत, तो दोन वर्षांपूर्वीचा आहे. आता आमच्यात कोणताही वाद नाही. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या घरगुती वादाचा गैरफायदा घेऊन माझ्या बदनामीचा डाव रचला आहे.
-एकनाथ पाटील, विधानसभा संघटक, शिवसेना, कल्याण ग्रामीण