कल्याण : राज्यात शिंदे फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडी यांच्यात नेहमीच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात. त्यात आणखीन एक वादग्रस्त विधान राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी आज कल्याणमध्ये केले आहे. भगवा रंग हा त्यागाचे प्रतीक असून भाजपाचा भगवा हा भोगाचे प्रतीक असे त्यांनी सांगितले. कल्याणमध्ये चव्हाण यांचा दौन दिवसीय दौरा आहे. कल्याणच्या चक्कीनाका येथून चव्हाण यांच्या उपस्थितीत जनसागर यात्रेला सुरुवात झाली. विशेष म्हणजे चव्हाण यांनी हनुमान मंदिरात जाऊन आधी हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर दौऱ्याला सुरुवात केली.
या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिरी ऋता आव्हाड, माया कटारीया, सारीका गायकवाड, मीनाक्षी अहिर, कुसुम गेडाम आदींचा सहभाग होता. यानंतर त्या पक्षाच्या शहर मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महिला वर्गाशी संवाद साधणार आहे. महाराष्ट्राच्या राजकीय सत्ता संघर्ष सोडविण्याचा वाद न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. मात्र, न्यायालयही दबावाखाली असल्याने तारीख पे तारीख दिली जात आहे अशी भावना जनतेच्या मनात बळावली असल्याचे प्रदेशाध्यक्षा चव्हाण यांनी सांगितले. देशातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी मोदी सरकार पूर्णपणो अपयशी झाले .बेरोजगारी व महागाई या प्रश्नावरून लक्ष विचिलत करण्यासाठी नवनवीन मुद्दे उकरुन काढले जात आहेत.
भाजपचे हिंदुत्व पूर्णपणे ढोंगी आहे. त्यांना हिंदू धर्माचे काही पडलेले नाही. आमचे फक्त दोनच प्रश्न आहेत महागाई कमी झाली पाहिजे बेरोजगारी कमी झाली पाहिजे. छत्रपती संभाजी राजे आणि शिवाजी महाराज कोण होते हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. कोणता धर्म स्वीकारायचा ? कोणी कोणाची पूजा करायची? कुणी कुणासोबत लग्न करायचे हे आमचे वैयिक्तक प्रश्न आहे याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधले. केंद्रात त्यांची सत्ता असल्याने राज्यात हे असंविधानिक सरकार टिकून असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.