डोंबिवली - देशात व परदेशातील उद्योगासह विविध क्षेत्रात आगरी भगिनींनी आपले वेगळेपण जोपासले आहे. शून्यातून भरारी घेतांना प्रत्येक वेळी आगरी समाजाने आमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. आपल्याच गावात मिळालेल्या प्रोत्साहनामुळे आम्हाला काम करण्यासाठी उभारी मिळाली. परिणामी आम्हाला संधीचे सोने करता आले. त्यामुळे समाजाप्रती आम्हाला खूप आदर आहे, असे प्रतिपादन `सन्मान आगरी स्त्री शक्ती'चा परिसंवादात आगरी समाजातील कर्तृत्ववान महिलांनी आपल्या जीवनाची यशोगाथा मांडताना केले.
आगरी युथ फोरम'च्या १९ व्या आगरी महोत्सवातील सहावा दिवस हा खास खास महिलांसाठी राखून ठेवण्यात आला होता. याप्रसंगी आगरी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे उपस्थित होते. रंगमंचावरील संपूर्ण जबाबदारी महिलांकडे सोपविण्यात आली होती. सूत्रसंचालन ते बक्षीस समारंभाच्या नियोजनात महिला आघाडीवर होत्या. आगरी समाजातील महिलाही कोठेही कमी पडू शकत नाहीत, याचा प्रत्यक्ष अनुभव समाजाने घेतला आणि सर्वांनी महिलांचं कौतुक केले. महिला दिन कार्यक्रमात महिलांनी गणपती नृत्य, रिंग नृत्य, आदिवासी नृत्य, मी हाय कोळीण, वेसावची पारू आदी नृत्याविष्कार सादर केले. विशेष म्हणजे ७२ वर्षांच्या आजीने स्वतः नृत्याचा आनंद घेवून कलाविष्कार सादर करतात संपूर्ण महोत्सव टाळ्यांच्या गजरांनी दणाणून गेला.
कर्तृत्ववान महिलांना प्रख्यात मुलाखतकार मृण्मयी भजक यांनी बोलतं केलं. मातृत्व, दातृत्व, नेतृत्व, आणि कर्तृत्व अशा चौकटीत या कर्तृत्ववान महिलांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. अमेरिकेतील पेट्रोलपंप व्यवसायात असलेल्या उद्योजिका डॉ. संगीता पाटील, नाशिकमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या सायली श्याम ठाकूर, कुस्ती पटू तथा महाराष्ट्र केसरी उपविजेती वैष्णवी दिलीप पाटील आणि सॅनिटरी नॅपकिन उद्योजिका सायली पाटील यांच्या कर्तृत्वाची भरारी नागरिकांनी ऐकली. त्यांचे प्रेरणादायक अनुभव त्यांना चेतना मिळवून दिले. त्यांची यशोगाथा, त्यांनी केलेले अपार कष्ट, प्रत्येक वेळेला आलेला अनुभव, जिद्दीने पेटून केलेला संघर्ष, त्याला मिळालेली कौटुंबिक साथ आणि विशेष म्हणजे प्रत्येक वेळी घेतलेली समाजाने दाखल याचा संपूर्ण आलेख कर्तृत्ववान महिलांनी सर्वांसमोर ठेवला. आज आम्हाला आगरी महोत्सवाच्या माध्यमातून घरचं व्यासपीठ मिळाले, याबद्दल खूप अभिमान वाटतो. आम्ही समाजाला मार्गदर्शनासाठी कार्यरत राहू, असे आश्वासनही या कर्तृत्ववान महिलांनी दिले.