कल्याण - सुशिक्षित, मध्यमवर्गीय, नोकरदार वर्गाचे शहर म्हणून डोंबिवली नगरीची ओळख आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून राहण्यास उत्तम शहर म्हणून अनेक नागरिक डोंबिवली स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे शहरात रिक्षांची संख्याही वाढली असून प्रवास करण्यासाठी रिक्षा हे माध्यम नोकरदार वर्गाचा अविभाज्य घटक झाला आहे. असे असले तरी आरटीओने दिलेल्या लेखी सूचनांची रिक्षाचालक बिनधास्त पायमल्ली करत असल्यामुळे सामान्य कल्याण डोंबिवलीकर मात्र मेटाकुटीस आलेत. त्यातच नजर जाईल तिकडे रिक्षाच रिक्षा असंच काहीसं चित्र दिसून येतंय. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉक हटविण्यात आला. मात्र या ठिकाणी लागलीच नवीन रिक्षा स्टँड निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकळ्या भूखंड दिसला की करा रिक्षा स्टँड अस काहीसं चित्र दिसून येतं.
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात स्मार्ट सिटी योजने अंतर्गत काम सुरू आहे. त्यामुळे आधीच कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले स्कायवॉक पाडण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. एकीकडे स्टेशन परिसर स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र अनधिकृत रिक्षा स्टँड स्टेशन परिसरात निर्माण होताहेत. कल्याण पश्चिम स्टेशन परिसरात एसटी बस डेपोला लागून असलेल्या परिसरातही स्कायवॉक हटविण्यात आला मात्र तेथील जागेवर नविन रिक्षा स्टँड निर्माण झाला. याबाबत कल्याणच्या काही जागरूक नागरिकांनी लोकमतशी संपर्क साधून ही व्यथा मांडली.
असंच होत राहील तर स्टेशन परिसर स्मार्ट कसा होणार? असा सवाल देखील नागरिकांमधून उपस्थित होत आहे. डोंबिवली पुर्वेकडील बाजीप्रभु चौकातील राम मंदिर वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने तेथून हटविण्यात आले परंतू ती जागा रिक्षा स्टँडने बळकाविल्याने मंदिर हटवून आणि रस्ता रूंद करून केडीएमसीने काय साध्य केले? असा सवाल आहे. खुल्या परवान्यामुळे रिक्षांची संख्या देखील वाढली आहे. शहरात सध्या रिक्षाच रिक्षा चोहीकडे असं दृश्य दिसून येत आहे.