डाेंबिवली : एकीकडे पावसाळ्यात निर्माण झालेले रस्त्यांतील खड्डे बहुतांश ठिकाणी कायम राहिले आहेत. सुस्थितीतील महत्त्वाचे रस्तेही धड राहिलेले नाहीत. या रस्त्यांंवरून जाणाऱ्या वाहनांना अचानक खड्ड्यांचा सामना करावा लागत असल्याने खड्डे वाचवण्याच्या नादात अपघात होण्याची शक्यता व्यक्त हाेत आहे.
पावसाळा आणि रस्त्यातील खड्डे हे समीकरण दरवर्षी पावसाळ्यात अनुभवायला मिळते. दिवाळीपूर्वी खड्डे बुजवले जातील, असा दावा केडीएमसीच्या वतीने करण्यात आला होता. आजही काही ठिकाणी रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण केल्याचे पाहायला मिळत आहे. भुयारी गटार योजना तसेच अन्य प्राधिकरणांच्या वाहिन्या टाकताना खोदलेल्या रस्त्यांनी ठाकुर्लीतील रेल्वे समांतर आणि ९० फुटी रस्त्याची वाताहत झाली आहे. चांगले सुस्थितीतील रस्तेही वाहन चालविण्यास धड राहिलेले नाहीत. पेंढरकर महाविद्यालयासमोरील रस्ता असो अथवा खंबाळपाडा परिसरातील न्यू कल्याण रोडची अवस्था पाहता याची प्रचीती येते. खंबाळपाडा परिसरातील अंतर्गत रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाली आहे.
ड्रेनेजच्या झाकणांभाेवती खड्डेघरडा सर्कल ते बंदीश पॅलेस यादरम्यानच्या रस्त्यावर टाकण्यात आलेल्या ड्रेनेजच्या झाकणांच्या भोवताली खड्डे पडले असून काही झाकणे रस्ता खचल्याने बाहेर आली आहेत. यात रस्त्यांची पातळी समप्रमाणात राहिलेली नाही. दोन वर्षांपूर्वी कल्याणमध्ये रस्ता समप्रमाणात नसल्याने दोघांचा बळी गेल्याची घटना घडली होती. आता डोंबिवलीतील रस्त्यांचीही तीच अवस्था असून एखादा बळी गेल्यानंतरच संबंधित यंत्रणेला जाग येणार का, असा सवाल केला जात आहे.
मोठमोठी संकुले आणि टूमदार बंगले उभे राहिलेल्या या भागातील दुरवस्थेच्या गर्तेत सापडलेले रस्ते पाहता त्यापेक्षा ग्रामीण भागातील रस्ते बरे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. सावित्रीबाई फुले कलामंदिरासमोरील रस्त्यावर महाकाय खड्डे पडले आहेत. त्याठिकाणी स्ट्रीट लाइटही बंद असल्याने अपघाताचा धोका पाहता रात्री जीव मुठीत घेऊनच वाहनचालकांना या मार्गावरून जावे लागत आहे. त्यामुळे शहरातील हे रस्ते केव्हा सुस्थितीत येणार, अशी विचारणा चालक करत आहेत.