कल्याण : शहराच्याच्या पश्चिम भागात पाणी पुरवठा सुरळीत केला जात नाही. नळाला पाणी येत नाही. जे पाणी येते तेही दूषित असते. तरी देखील प्रशासनाकडून नागरीकांना पाण्याची बिले कशी काय पाठविली जातात. आधी शुद्ध पाणी पुरवठा करा मगच नागरीकांकडून पाणी बिलाची वसूली केली. येत्या सात दिवसात पाणी पुरवठा सुरळित झाला नाही तर महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या महिला संघटक नेत्रा उगले यांनी दिला आहे.शहराच्या पश्चिमेतील ठाणकरपाडा, बेतूरकरपाडा, मनिषानगर, दुर्गानगर, साईनगर या भागात पाणी टंचाई आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. नळाद्वारे येणारे पाणी दूषित असते. या पूर्वीही शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक माेहन उगले यानी वारंवार प्रशासाकडे पाठपुरवा केला आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंते प्रमोद मोरे यांच्या दालनात जाऊन पाणी प्रश्न का सूटत नाही. याचा जाब विचारला होता. मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. काही दिवसापूर्वी अभियंता मोरे यांना दालनात प्रवेश करण्यापासून उगले यांनी रोखले होते. याच प्रश्नावर स्वत: उगले हे आंदोलन करणार होते. मात्र त्याची प्रकृती ठिक नसल्याने शिवसेना महिला संघटक नेत्रा उगले यांनी महिलांसोबत अभियंते मोरे यांचे दालन आज गाठले. त्यांना पाणी पुरवठा सुरळित करण्याविषयी जाब विचारला. येत्या सात दिवसात पाणी पुरवठा सुरळित झाला नाही तर आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी माजी नगरसेवक उगले हे रुग्णालयात दाखल असल्याने त्यांनी व्हीडीओ कॉलद्वारे अभियंते मोरे यांच्याशी संपर्क साधला. नागरीकांच्या पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी केली.दरम्यान कालच डोंबिवलीतील राजूनगर आणि गरीबाचा वाडा येथील नागरीकांना पाण्याची समस्या भेडसावत असल्याने भाजप माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेऊन पाणी समस्या सात दिवसात सुटली नाही तर ठिय्या आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे. त्या पाठोपाठ आत्ता शिवसेना शिंदे गटाने सात दिवसाचा अल्टीमेट प्रशासनाला दिला आहे. यंदा बारवी धरणात पुरेसा पाणी साठा आहे. पाणी साठा पुरेसा असताना नागरीकांना पाण्याची समस्या का भेडसावत आहे असा संतप्त सवाल भाजप आणि शिवेसना शिंदे गटाकडून उपस्थित केला जात आहे.
नळाला पाणी येत नाही, आले तर तेही दूषित; शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने विचारला प्रशासनाला जाब
By मुरलीधर भवार | Published: October 11, 2023 4:27 PM