लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण शीळ रस्त्यालगत खिडकाळी येथे पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी शुक्रवारी सायंकाळी फुटल्याने परिसर जलमय झाला होता. जवळपासच्या घरांत यामुळे पाणी शिरले होते. तसेच कल्याण शीळ रस्त्यावर वाहतूककोंडीही झाली होती. दिवा, मुंब्रा, कळवा, वागळे इस्टेट, तसेच २७ गावे आदी भागांच्या पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार आहे.
पाण्याचा जोर इतका जास्त आहे की, तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेता येणार नाही. रात्री उशिरा जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. वारंवार याच ठिकाणी जलवाहिनी फुटण्याचे प्रकार कसे होतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. २२० मिली मीटर व्यासाच्या या बड्या जलवाहिनीवर अनेक जणांनी बेकायदेशीर टॅपिंग करुन पाणी पुरवठ्याचे कनेक्शन घेतले आहे. त्यामुळेही हे प्रकार होत असावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पाणी चोरीच्या विरोधात एमआयडीसीकडून कारवाई केली जात नाही. जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती तातडीने हाती घ्यावी. या जलवाहिन्या फुटण्याच्या प्रकाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी यापूर्वीच केली आहे.