कल्याण- डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर आणि गरीबाचा वाडा परिसरात पाणी टंचाईचा सामना नागरीक करीत आहे. गेल्या सात वर्षापासून पाण्याची समस्या नागरीकांना भेडसावत आहे. त्याठिकाणीचे पाणी पुरवठा अभियंते केवळ आश्वासन देतात. पाणी मिळत नाही. पाण्याचा टँकर ही पुरविला जात नाही. नागरीकांना पाणी मिळाले नाही तर महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदाेलन करण्याचा इशारा माजी स्थायी समिती सभापती आणि भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी दिला आहे.
भाजपचे माजी नगरसेवक म्हात्रे यांनी आज महापालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली. राजूनगर आणि गरीबाचा वाडा या परिसरातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. या समस्येबाबत वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. तसेच पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता अनिरुद्ध सराफ यांच्याकडे मागणी केली आहे. गेल्या सात वर्षापासून नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही समस्या सोडविण्याकरीता प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्याला अभियंते सराफ हे जबाबदार आहे. '
नागरिकाची पाणी समस्या सोेडविण्यास असमर्थ असलेल्या सराफ यांची बदली करण्यात यावी. महापालिका हद्दीतील ज्या प्रभागा पाणी टंचाई असते. त्याठिकाणी महापालिका पाण्याचा टँकर मोफत पुरविते. राजूनगर आणि गरीबाचा वाडा या परिसरात पाणी टंचाई असता महापालिकेकडून पाण्याचा टँकर पुरविला जात नाही. या ठिकाणच्या नागरीकांना खाजगी टँकर चालकाकडून १५०० रुपये खर्च करुन टँकर खरेदी करावा लागत आहे. नळाला पाणी येत नसले तरी त्याचेही सरासरी बिल नागरीकांना भरावे लागत आहे. खाजगी टँकर चालकाकडून पाणी घेण्यास एका महिन्याला ४५ हजार रुपये खर्च येत आहे.
राजूनगर आणि गरीबाचा वाडा या परिसरात नागरी वस्ती वाढत आहे. नव्या नागरी वस्तीकरीता पाणी पुरवठ्याची सहा कनेक्शन देणे आवश्यक असताना त्याठिकाणी अभियंते सराफ यांच्याकडून केवळ दोन ते तीन कनेक्शनच दिली जात आहे. आहे त्या नागरी वस्तीला पाणी पुरवठा मिळत नाही. तसेच नव्याने झालेल्या नागरी वस्तीलाही पाणी मिळत नाही. पाणी समस्या सोडविली नाही तर महापालिका मुख्यालयात नागरीकांच्या समवेत ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा म्हात्रे यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.