डोंबिवली : तापमानाचा पारा वाढत असताना कल्याण ग्रामीणमधील बहुतांश गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. डोंबिवलीतील सांगाव-सांगर्ली प्रभागातील नागरिक टंचाईने हैराण झाले आहेत. पाणीसमस्या सोडवावी, यासाठी तेथील भाजपच्या माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांनी वारंवार शहरातील एमआयडीसीच्या कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला. मात्र, एमआयडीसीने त्याला केराची टोपली दाखविल्याने पाटील यांनी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांना पाणीकपात रद्द न केल्यास आणि पाण्याचे समान वितरण न केल्यास आत्मदहन करू, असा इशारा पत्राद्वारे गुरुवारी दिला आहे.
एमआयडीसी आणि महापालिका प्रशासन यांच्यातील पाणीबिल थकबाकीचा अनेक वर्षांपासून तिढा सुटत नसल्याचा फटका बसत आहे. रहिवासी घराबाहेर पहाटे चार वाजता नळावर पाणी भरण्यासाठी रांग लावतात. टँकरने पाणी मागवावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसतो. अनेक वर्षांपासून हीच परिस्थिती असल्याने नागरिक लोकप्रतिनिधींना जाब विचारतात, त्यांना उत्तर काय देणार, असा सवाल पाटील यांनी केला.
२७ गावांची पाणीबिले थकली आहेत. केडीएमसीने २०१६ मध्ये २७ गावांच्या पाणीबिलापोटी पाच कोटींचा भरणा एमआयडीसीकडे केला होता. उर्वरित ४१८ कोटी थकीत आहेत. थकबाकी व नियमित देयकांचा भरणा होत नसल्याने एमआयडीसीने २७ गावांत कपात करावी लागत असल्याचे केडीएमसीला पत्राद्वारे कळविले आहे. २७ गावे मनपात समाविष्ट झाल्यानंतर त्यांना पाणी, रस्ते आणि इतर सुविधा मिळवून देणे ही मनपाची जबाबदारी आहे, असे पाटील म्हणाल्या. मनपा यातून मार्ग काढण्याऐवजी पाणीबिल थकवत आली आहे. पाच वर्षे मनपा हेच करीत आल्याने गावांना कपातीचा सामना करावा लागत आहे. नागरिक लोकप्रतिनिधींना याचा जाब विचारत आहेत. लोकप्रतिनिधी एमआयडीसी, तर कधी मनपा कार्यालयात हेलपाटे मारतात. मात्र, थकबाकी भरत नाही, तोपर्यंत पाणीकपात करीत राहणार, अशी एमआयडीसीची भूमिका असल्याचे समजले. त्यामुळे या सर्वांवर तत्काळ उपाययोजना करा, अन्यथा पाण्यासाठी आत्मदहन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.
२७ गावांत पाणीपुरवठा कमी हाेत आहे हे आम्ही एमआयडीसीला पत्रांद्वारे वेळाेवेळी कळविले आहे. ती यंत्रणादेखील सर्व प्रयत्न करत आहे. थकीत पाणी बिल आणि पाणी कमी दाबाने येणाचा काही संबंध असेल असे वाटत नाही. - राजीव पाठक, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग, केडीएमसी