कल्याण - एक तर एमआयडीसीकडून ड्रेनेज लाईनचे नियोजन नाही. दुसरीकडे एमआयडीसीची संरक्षक भिंत पडली. गेल्या चार महिन्यापासून एका घरात ड्रेनेजचे पाणी शिरते. आज पडलेल्या जोरदार पावसामुळे त्या घरात चक्क धबधबाच वाहू लागला. घरातील सर्व साहित्य पावसामुळे खराब झाले. कुटुंबातील कुटुंब प्रमुख या पाण्यात पडून त्यांना दोन वेळा शस्त्रक्रिया करावी लागली. मात्र एमआयडीसी प्रशासन या समस्येकडे लक्ष देण्यास तयार नाही.
कल्याण ग्रामीणमधील काटई परिसरात नामदेव पाटील हे त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. त्यांची पत्नी आणि मुलगा असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या घराच्या बाजूलाच एमआयडीसीचे एक कार्यालय आहे. तसेच एमआयडीसीची संरक्षक भिंत आहे. या भिंतीला काही दिवसापूर्वीच भगदाड पडले होते. ही भिंत मोकडकळीस आली होती. मात्र तिच्या देखभाल दुरुस्तीकडे एमआयडीसीने लक्ष दिले नाही. दुसरीकडे एमआयडीसीकडून ड्रेनेज लाईनचे नियोजन केले जात नाही.
भिंतीला भगदाड पडल्याने ड्रेनेज लाईनचे दुर्गंधी यूक्त पाण्याचा पाटील कुटुंबियांना त्रास होत होता. त्यात पावसाचे पाणी त्यांच्या घरात शिरत होते. आज तर कहरच झाला. आज अर्धा तास जोरदार पाऊस पडला. त्या पावसात एमआयडीसीची भिंत कोसळली. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मार्ग नसल्याने पावसाचे सगळे पाणी पाटील यांच्या घरात शिरले. या पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की त्यांच्या घराला धबधब्याचे स्वरुप आले होते. त्यात त्यांचे घरच वाहून गेले असल्याचे पाटील यांच्या पत्नी अरुणा यांनी सांगितले. एमआयडीसीच्या नाकर्तेपणाचा फटका पाटील कुटुंबियांना बसला आहे. यापूर्वी पावसाचे पाणी घरात शिरल्याने घर मालक नामदेव पाटील हे पडले होते. त्यांच्यावर दोन वेळा शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली होती.