मयुरी चव्हाण
कल्याण - कल्याणडोंबिवली शहर जसे अनधिकृत बांधकामामुळे कायम वादग्रस्त चर्चेत असते, त्याचप्रमाणे अनधिकृत फलकांचा मुद्दा देखील नेहमीच समोर आला आहे. मराठी भाषेविषयी असलेले प्रेम असो किंवा इतर शहरातील समस्यांवर प्रत्यक्ष कृती करण्यापेक्षा तरुणाई ही सोशल मीडियावर लांबलचक वाद घालून तो मुद्दा तिथेच सोडून देते. मात्र, कल्याणातील एका तरुणाने हिंदी भाषेत लावण्यात आलेल्या अनधिकृत फलकाची तक्रार करत तो हटविण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून केवळ "बोलून नाही" तर प्रत्यक्षात या तरुणाने "करुन दाखविलं" असंच म्हणावं लागेल. कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा चौक परिसरात एका राजकीय पक्षाने अनधिकृत बॅनर लावला होता. इतकेच नाही तर त्यावर हिंदी भाषेतून एक संदेश लिहिण्यात आला होता. कल्याणमधील तरुण भूषण पवार यांने हा अनधिकृत फलक पाहिला आणि लागलीच याची कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन व इतर यंत्रणांकडे तक्रार केली. तक्रारीचा पाठपुरावा केल्याने हा अनधिकृत फलक तात्काळ केडीएमसीकडून हटविण्यात आला. या वृत्ताला ब प्रभाग क्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगताप यांनीही दुजोरा दिला आहे. मराठी केवळ आपली मातृभाषा नाही तर आपली ओळख आहे, आपली अस्मिता आहे.
ज्या भाषेने आपल्या मुखात पहिला शब्द दिला तिला राज्यात दुय्यम स्थान भेटत आहे, इथे जन्माला आलेला तथा राज्यात वास्तव्यास असलेला प्रत्येक नागरिक हा मराठी भाषा संवर्धनासाठी पेटून उठला पाहिजे असे मत भूषण यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य कल्याण शहर समनव्यक म्हणून भूषण कार्यरत आहेत. दरम्यान, हा हिंदी भाषिक फलक भाजपा पक्षाकडून लावण्यात आला होता. त्यावर पश्चिम बंगालमधील सरकारवर टीका करण्यात आली होती.
माय मराठीचा नेहमीच अभिमान
ऐतिहासिक कल्याण आणि सांस्कृतिक नगरी डोंबिवलीमध्ये मध्यमवर्गीय मराठी भाषिक वर्ग मोठ्या प्रमाणावर राहतोय. येथे मराठमोळे सणदेखील आजही पारंपारिक पद्धतीने साजरे केले जात आहेत. यापूर्वी देखील शहरात मराठी अस्मितेचा मुद्दा अनेकदा समोर आला होता. मग, गुजराती भाषेत इमारतीला दिलेलं नाव असो की डोंबिवलीत आयोजित करण्यात एका क्रिकेट स्पर्धेत मराठी भाषिकांना करण्यात आलेली नो एन्ट्री असो. यावेळी सर्व स्तरातून तीव्र विरोध करण्यात आला होता. अखेर ही क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आली.