कल्याण :
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष संपलाय, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणार नाही, असे म्हणणारे मनसेवर टीका करताहेत. राज ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या मतांवर शरद पवार बोलताहेत. याचा अर्थ राज ठाकरे यांच्यावर पवार यांचे बारकाईने लक्ष आहे, अशी खोचक टीका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली.
नांदगावकर म्हणाले की, इतर नेत्यांनी प्रतिक्रिया देणे आणि पवार यांनी प्रतिक्रिया देणे यामध्ये फरक आहे. गुढीपाडव्याची सभा झाल्यानंतर पवारांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. ठाण्यातील सभेनंतर तातडीने उत्तर दिले. पवार यांचे राज ठाकरे व मनसेवर बारकाईने लक्ष आहे, याचाच हा पुरावा आहे. पवार यांच्यासारखा नेता आमच्या नेत्याची दखल घेतो, याचा आम्हाला आनंद आहे, असेही नांदगावकर म्हणाले.
सरकारला अल्टिमेटम देण्याची ताकद फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच होती, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली असल्याकडे नांदगावकर यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले की, बाळासाहेबांच्या तालमीत राज ठाकरे तयार झाले आहेत. त्यामुळे बाळासाहेबांचे बरेच गुण राज यांच्यामध्ये आहेत. त्यामुळे अल्टिमेटम देणे हा उपजत गुण राज यांच्यात आला आहे.
डोंबिवलीत गुरुवारी सायंकाळी मनसे आमदार राजू पाटील यांच्या पुतणीच्या लग्नासाठी शर्मिला ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे, नेते बाळा नांदगावकर आले होते. अनेक दिग्गजांनी या लग्नाला हजेरी लावली.