कल्यान - बुधवारी कल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीत तबल 392 कोरोना रुग्ण आढळल्याने महापालिका प्रशासनाची धावपळ उडाली. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने बुधवारी संध्याकाळी साधारणपणे साडे सहा वाजण्याच्या सुमारास माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानांना सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बार हॉटेल्स- रेस्टॉरंट रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहतील असेही त्यांनी नमुद केले होते. (What exactly happened in an hour? Why is the municipal administration kind to bars and restaurants?)
मात्र एक तासाच्या कालावधीनंतर महापालिकेने कोलांटीउडी घेत बार आणि हॉटेल्स रात्री 9 वाजेपर्यंत नाही तर रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या एका तासात नेमकं काय घडलं? पालिकेने आपला निर्णय का बदलला? पालिका प्रशासन हॉटेल आणि बार वर मेहेरबान का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
त्यातच शनिवारी आणि रविवारी p1 pe नुसार दुकानं सुरू राहतील असे आदेशही पालिकेने दिले आहेत. त्यामुळे साहजिकच व्यापाऱ्यांचे यात नुकसान होणार आहे. असे असताना बार आणि हॉटेल्स बाबत मात्र वेगळा निर्णय घेतला जातो. हातगाडीलासुद्धा सायंकाळी 7 तर पोळीभाजी केंद्राला सुद्धा रात्री 9 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. हे सर्व एकीकडे असताना फक्त बार आणि हॉटेल बाबत वेगळा निर्णय घेतला जात आहे.
कोरोनां फक्त आमच्याच दुकानातून पसरतो का? बार आणि रेस्टॉरंटमधून कोरोनाचा प्रसार होणार नाही का? आमच्या बाबतीतच दुजाभाव का, अशा एक ना अनेक प्रश्नांचा भडिमार कल्याणडोंबिवलीतील व्यापारी करू लागलेत. झाले असे की , केडीएमसी प्रशासनाने बार आणि हॉटेल सुरू ठेवण्यास रात्री 11 वाजेपर्यंत वाढीव मुदत दिली.या निर्णयामुळे सध्या व्यापारी वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे. इतर ठिकाणी ज्याप्रमाणे नियम सर्वांसाठी सारखे लागू करण्यात आले आहेत, त्याप्रमाणे केडीएमसीनेही सर्वांना सारखे नियम लागू करावेत. आम्ही केडीएमसीच्या सोबत आहोत मात्र आमच्या बाबतीत दुजाभाव केला जात असल्याच्या भावना व्यापारी व्यक्त करत आहेत.
त्यामुळे येणाऱ्या काळात व्यापाऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी केडीएमसीकडून काही वेगळा निर्णय घेण्यात येतो का तसेच व्यपाऱ्यांच्या प्रतिनिधींशी पालिका प्रशासन चर्चा करून काही तोडगा काढते का ? हे पाहणे महत्वाचे आहे. त्यासोबतच नियम मोडल्यावर ज्याप्रमाणे फेरीवाले, सामान्य नागरिक, व्यापारी यांच्यावर कारवाई केली जाते तशी बेधडक कारवाई या हॉटेल्स आणि बारवर देखील केली जाते का ते येणाऱ्या दिवसात समजेल.