डोंबिवली - मध्य रेल्वेवर कल्याण सीएसएमटी मार्गावर गुरुवारपासून एसी लोकल सुरू झाली खरी, पण त्यास पहिल्या दिवशी फार प्रतिसाद।मिळाला नाही. तो मिळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ती लोकल बदलापूर किंवा टिटवाळा मार्गावर विस्तारीत करावी. रेल्वे प्रशासनाने चाचणीही केली होती, परंतु प्रत्यक्षात मात्र लोकल सुरू करताना कल्याण येथून सुरू केल्याने बदलापूर, अंबरनाथ मार्गावरील प्रवासी नाराज झाले असून त्या लोकलचा विस्तार करावा अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने केली.
महासंघाचे उपाध्यक्ष संजय मेस्त्री हे बदलापूरचे रहिवासी असून त्यांनी यासंदर्भात आधीही मागणी केली होती, त्यानुसार चाचणी झाली होती, पण पुढे नियोजन कागदावरच राहिले का? असा सवाल त्यांनी केला.
माजी खासदार आनन्द परांजपे यांनी २०१२ मध्ये ज्यावेळी १५ डबा लोकल सुरू करताना देखील बदलापूर, आसनगाव येथील स्थानकांचा विचार करावा अशी मागणी केली होती, त्यानुसार रेल्वेने विचार करून चाचणी केली होती, तेव्हा तो प्रस्ताव यशस्वी होऊ शकतो असे सांगितले होते, पण त्याचेही पुढे काहीच झाले नाही. बदलापूर, आसनगाव हा पट्टा देखील झपाट्याने शहरिकरणात येत असून सामान्य नागरिक तेथे परवडणाऱ्या दरात किंवा सेकंड होम च्या दृष्टीने वास्तव्याला येत आहेत, त्या नागरिकांना लोकल प्रवास परवडणारा व सुखाचा आहे. त्यामुळे रेल्वेने महासंघाच्या मागणीचा विचार करून नव्या येणाऱ्या वेळापत्रकात त्या लोकलसह अन्य लोकलच्या फेर्या वाढवाव्यात अशी मागणी मेस्त्री यांनी।केली.
* एसी लोकलमधील तिकीटांचे दर देखील कमी करावेत, तसेच जर त्या लोकलला प्रतिसाद मिळत नसेल तर त्या लोकलचे अर्धे डबे एसीला व अर्धे समान्यांसाठी असावेत अशीही मागणी मेस्त्री यांनी केली आहे.