सरकारी अधिकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी वर्ग डोळ्यासमोर आला की, आपल्यासमोर लागलीच नकारात्मक किंवा एक विशिष्ट साचेबद्ध प्रतिमा उभी राहते. मात्र काही अधिकारी याला अपवादही असतात हे अनेकदा दिसून आलंय. कच-यासारखा संवेदनशील विषय योग्यप्रकारे हाताळल्याबद्दल कल्याणडोंबिवली महानगरपालिकेतील घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांचे नाव माथेरानच्या एका रस्त्याला देण्यात येणार आहे. लवकरच या रस्त्याचा छोटेखानी नामकरण सोहळा संपन्न होणार आहे. उत्कृष्ट काम केल्याने एका पालिकेच्या अधिका-याबद्दल अशी देखील कृतज्ञता व्यक्त केली जाते हे या उदाहरणातुन समोर आलं आहे.
माथेरान नगरपरिषदेमध्ये मुख्याधिकारी म्हणून काम करत असताना रामदास कोकरे यांनी ओला सुका कचरा वर्गीकरण, प्लास्टिक मुक्त माथेरान , डम्पिंगमुक्त माथेरान इत्यादी उल्लेखनीय कामगिरी बजावली. माथेरान चा ओला कचरा 100 टक्के बायोगॅस प्रकल्पात प्रक्रिया केला जातो तर डम्पिंग वर जाणारा कचराही पूर्णतः बंद झालाय. कोकरे यांच्या कामगिरीमुळे माथेरान शहराचे सौंदर्य आणखीब बहरून आले. त्यामुळे प्रोत्साहानात्मक बाब म्हणून सेंट व्हीला ते जुन्या डम्पिंग ग्राऊंड कडे जाणाऱ्या रस्त्याला कोकरे यांचे नाव देण्याचा निर्णय माथेरान नगरपरिषदेने घेतलं आहे.
कचऱ्यासारखा जिव्हाळयाचा विषय मार्गी लावायचा म्हटला की नागरिकांची मानसिकता, काहीसा राजकीय दबाव या गोष्टी आल्याच ! मात्र हे सर्व अडथळे पार करून कचरा प्रश्न सोडविण्याचे काम वाटते तितके सोपे नाही. त्यावेळी रायगड जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून डॉ विजय सूर्यवंशी कार्यरत होते जे आता केडीएमसीचे आयुक्त म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे ही जोडी कल्याण मधील डम्पिंग ग्राउंड सुद्धा लवकरच बंद करतील अशी आशा निर्माण झाली.