डोंबिवली - आसनगाव स्थानकात कसारा येथून मुंबईसाठी आलेल्या लोकलच्या चाकाला आग लागल्याची घटना ८ वाजून १८ मिनिटांनी घडली, त्यापाठोपाठ वासिंद-खडवली दरम्यान पवन एक्सप्रेसच्या इंजिनचा प्रेशर पाईप फाटल्याने मध्य रेल्वेची कसारा दिशेची वाहतूक गुरुवारी सकाळपासून दुपारपर्यंत मंड गतीने सुरू असल्याने हजारो प्रवाशांचे नियोजन सपशेल कोलमडले.
लोकल आसनगाव येथे येताच ब्रेक जामझाल्याने चाकाला आग लागल्याने काही प्रवाशांनी घाबरून लोकलमधून उड्या मारल्या, त्यात कोणताही अपघात झाला नाही, ती आग मोटरमन, गार्ड यांच्यासह सतर्क प्रवाशांनी लगेच विझवली आणि ती।लोकल।पंधरा मिनिटांनी मुंबईकडे रवाना झाली. त्यामुळे वाहतूक कोलमडल्याने कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश राऊत यांनी सांगितले.
पवन एक्सप्रेस वसिंद स्थानकात येताच त्या गाडीचा प्रेशर पाईप फुटल्याची तांत्रिक बिघाडाची घटना घडली, त्यामुळे रेल्वेने ती गाडी वासिंद येथे आणून तिचे दुरुस्ती काम सुरू केले. दुपारी एक वाजता ती घटना घडल्याने मध्य रेल्वे कल्याण कसारा मार्ग पुन्हा एकदा मंदावला आहे. दररोज अशा घटना घडत असल्याने कल्याण-कसारामार्गावर नेहमी लोकल सेवा उशीरा धावत आहेत. ३री आणि ४ थी रेल्वेमार्गाचे काम कासवगतीने सुरू आहे ते युद्धपातळीवर सुरू व्हावे ही मागणी नेहमी होत असताना रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे यामुळे रेल्वे प्रवाशांत प्रचंड नाराजी असल्याचे संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख महेश तारमले यांनी सांगितले.
रेल्वे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन नवीन रेल्वे मार्गांचे काम युद्धपातळीवर सुरू करावे याबाबत लवकरच अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची भेट घेणार असल्याचे संघटनेचे उमेश विशे यांनी सांगितले.