कल्याण- एक गोंधळी जागरण करतो. दुसरा कंटेनर लोड करणयाचे काम करतो. तिसरा आयटीआय करुन चांगल्या ठिकाणी काम करतो. तरी पण या तिघांनी एका अल्पवयीन मुलाच्या संगतीत येऊन मोबाईल चोरीचे कृत्य केले. एका दिवसात एक-दोन नव्हे तर पाच महिलांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. सीसीटीव्हीच्या सहाय्याने तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. त्यांचा म्होरक्या असलेला अल्पवयीन मुलगा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. कोळसेवाडी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
कल्याण पूर्वेतील हाजी मलंग रोड परिसरात दीपाली पाटील नावाची २३ वर्षीय तरुणी रस्त्याने जात असताना एका दुचाकीवरुन आलेल्या तरुणांनी तिच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. दीपाली पाटील यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी दीनकर पगारे आणि हेमंत ढाेले यांच्या पथकाने तपास सुरु केला. मोबाईल चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. सीसीटीव्ही फूटेजमुळे चोरट्यांच्या गाडीचा नंबर पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेतला. अक्षय इंगोले, उमेश तरे आणि सुमित पाटील या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्यासोबत एक अल्पवयीन तरुण देखील होता. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. मात्र अटक आराेपींकडून जे खुलासे झाले आहेत. ते अतिशय धक्कादायक आहे.
अटक झालेले सर्व आरोपी हे चांगल्या घरातील आहेत. त्यांना पैशांची काही कमी नाही. मात्र एक अल्पवयीन तरुण त्या तिघांचा मित्र आहे. या तिघांना मौजमजेसाठी पैसे हवे होते. त्यासाठी या तिघांना अल्पवयीन मुलाने सांगितले की, आपण चोरी करु. त्यात काही होत नाही. कोणी पकडले जात नाही. त्या अल्पवयीन मुलाच्या सांगण्यावरुन चाैघांनी मिळून दोन तासाच पाच जणांचे मोबाईल हिसकावले. आत्ता तिघे पकडले गेले आहेत. यापैकी अक्षय इंगोले हा गोंधळी आहे. तो जागरणाचे काम करतो. उमेश हा अंबरनााथमधील एका मोठ्या कंपनीत कंटेनर लोडिंगचे काम करतो. सुमित पाटील हा आयटीआय करुन टर्नरचे काम करीत होता.