लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण: गणेशोत्सव व नवरात्रौत्सवाच्या धर्तीवर केडीएमसीकडून हद्दीतील सर्वच तलावांची स्वछता केली जाते पण उत्सव संपताच या तलावांना पुन्हा डंपिंगचे स्वरूप प्राप्त होते. या तलावांमध्ये भाविक भक्ती भावाने गणोश मूर्तीचे तसेच देवींच्या मूर्तीचे विसर्जन करतात पण त्याचबरोबर या तलावात प्लास्टिक पिशव्यात भरून निर्माल्यही टाकले जाते. दरम्यान माघी गणेशोत्सवला अवघे तीन दिवस राहीले असतानाही ज्याठिकाणी विसर्जन केले जाते त्या तलावांच्या स्वछतेला मनपाला मुहूर्त मिळालेला नाही.
शहरी भाग असो वा ग्रामीण भाग यामधील तलाव हे कल्याण डोंबिवलीतील पाणीपुरवठयाचे एकेकाळी मुख्य स्त्रोत होते. पण आता तलाव डंपिंग ग्राउंड ठरली आहेत. प्लास्टिक पिशव्या, कचरा, पुजेचे साहित्य टाकण्याचे एकमात्र ठिकाण म्हणून त्यांची ओळख आहे. गणेशोत्सवाच्या धर्तीवर कृत्रिम तलाव महापालिकेकडून बनवले जातात, पण आजही सर्वाधिक पसंती ही नैसर्गिक तलावांना मिळते परंतु या तलावांच्या स्वछतेचा प्रश्न हा कायमच उदभवत असतो. गणोशोत्सव असो अथवा नवरात्रौत्सव या उत्सवापूर्वी ही स्वछता व्हावी अशी मागणी स्थानिक नागरीकांकडून होत असते. परंतु ही स्वछता उत्सवकाळापुरतीच मर्यादित राहते आणि उत्सव संपताच तलावाच्या देखभालीकडे सर्रास दुर्लक्ष होते. महापालिकेच्या वतीने तलावांच्या अवतीभवती निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत.
तरीही नागरिकांकडून निर्माल्य हे बिनदिककतपणे तलावात टाकले जाते. काही ठिकाणच्या तलावांची पाहणी केली असता हे चित्र आवजरुन दिसून येते. कल्याणमधील आधारवाडी तलावात मोठया प्रमाणात शेवाळ आणि जलपर्णी असून तलावाला डंपिंगचे स्वरूप आले आहे. डोंबिवलीतील खंबाळपाडा तलावाच्या स्वच्छतेकडेही दुर्लक्ष झाले आहे. काठावर जलपर्णी साचल्याचे दिसत आहे. डोंबिवली शहरात ज्याठिकाणी मोठया प्रमाणात गणेश मुर्त्यांचे. विसर्जन होते त्या चोळेगावातील तलावाच्या स्वच्छतेलाही अजून मुहुर्त मिळालेला नाही.