प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला दाखल करून घेण्यास नकार दिल्याप्रकरणी मनसे आणि ठाकरे गट चांगलेच आक्रमक झाले आहेत. शनिवारी रात्री मनसेने ठिय्या आंदोलन करून रूग्णालय प्रशासनाचा निषेध नोंदवला. दरम्यान कल्याणकरांचे कल्याण कधी होणार की नुसत्याच स्मार्ट सिटीच्या आशेवर स्मार्ट लोकांच्या थापा अशी सडेतोड टीका मनसेचे आमदार राजू पाटील यांनी प्रशासनासह सत्ताधा-यांवर केली आहे. ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीनेही रविवारी रूग्णालयात धडक देत प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला.
शनिवारी रात्री एका महिलेला केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयाच्या नजीक असलेल्या स्कायवॉकवर प्रसूतीवेदना सुरू झाल्या. नागरीक आणि पोलिसांनी तीला रूक्मिणीबाई रूग्णालयात आणले. मात्र रूग्णालयातील कर्मचा-यांनी महिलेला दाखल करून घेण्यास नकार दिला. तीची प्रसूती रूग्णालयाच्या प्रवेशद्वारातच झाली. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला दिलेल्या वागणूकीचा मनसेकडून रात्रीच ठिय्या आंदोलन छेडत निषेध व्यक्त केला गेला. संबंधित स्टाफवर कारवाईची मागणी देखील केली गेली. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील रूग्णालय प्रशासनाच्या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे.
एका महिला भगिनीची प्रसूती सार्वजनिक ठिकाणी होणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे म्हंटले आहे. प्रशासनसह सत्ताधा-यांवर तोंडसुख घेताना पाटील यांनी या घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हायला हवी अशी प्रतिक्रिया दिली. रविवारी सकाळी ठाकरे गटाच्या महिला जिल्हा संघटक विजया पोटे, मिना साळवे, शरद पाटील, रूपेश भोईर यांनीही रूग्णालयात धडक देत तेथील डॉक्टर आणि कर्मचा-यांना जाब विचारला. लवकरच या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करू असे आश्वासन मनपाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी ठाकरे गटाच्या पदाधिका-यांना दिले.