डोंबिवली: "पालकमंत्री एकनाथ शिंदे तुम्ही गेली सात वर्षे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत आहात. तुमच्या मंत्रिपदाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याला नगरविकाससारखे शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे खाते प्रथमच मिळाले आहे. गेली दोन वर्षे या नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून शिंदेंनी केडीएमसीसंबंधित विषय अजूनही प्रलंबित ठेवले आहेत. वास्तविकपणे, ठाणे डोंबिवलीकल्याण अंबरनाथ या शहरांनी आपल्याला आणि आपल्या पक्षाला गेली २५ वर्षे एकहाती सत्ता दिली. त्यामुळे इथल्या नागरिकांचे जीवन सुसह्य करणे आपले कर्तव्य ठरते," असा टोला आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत लगावला. व्यस्त कार्यभारामुळे या महापालिकेकडे त्यांचे सपशेल दुर्लक्ष होत आहे म्हणूनच नगरविकास खात्या अंतर्गत मागील सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबाजवणी करण्याचे स्मरण करून देत असल्याचे ते म्हणाले.
माध्यमांसमोर त्यांनी अपूर्ण प्रकल्पांच्या कामांची जंत्रीच मांडली. "प्रमुख्याने सूतिकागृह पुनर्विकास कामासाठी चालना २१ ऑक्टोबर २०१४ ला मिळाली. महापालिका महासभा ठराव २० नोव्हेंबर २१६ रोजी झाला. चार वेळा स्वारस्य देकार काढले. अखेर २५ फेब्रुवारी २०२० एकच स्वारस्य देकार आला. रुबी हेल्थकेयर व आशर बिल्डर्स यांचा ९ नोव्हेंबर २०२० रोजी देकार आला. सात वर्षे झाली सूतिकागृहाचे बाळंतपण कधी? आयुक्त सूर्यवंशी आणि कायदा विभागाचे अधिकारी सूर्यवंशी या दोन्ही अधिकाऱ्यांचा वेळकाढूपणाचा जाच सूतिकागृहाला किती काळ सहन करावा लागणार?," असा सवाल चव्हाण यांनी केला.
मोठागाव-माणकोली पुलाचं बांधकाम कधी?"मोठागाव माणकोली पुलाचे बांधकामाकरीता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या विशेषाधिकारात २२३ कोटी निधी दिला होता. त्या पुलाचे बांधकाम कधी होणार? कल्याण शीळ रोडच्या काँक्रिटीकरण व विस्तारासाठी मंजुरी आणि ७७३ कोटी निधीला मंजुरी दिला होती अजूनही काम पूर्ण का होत नाही? अजून किती अंत पाहणार? राज्य शासनाने मंजुरी दिलेल्या केडीएमसीमधील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेसाठी महत्वाच्या रिंग रोडच्या दुर्गाडी मोठागाव हेदुटणे मार्गाचे बांधकाम कधी होणार? अत्यंत महत्वाकांक्षी अशा ऐरोली काटई भुयारी व उन्नत मार्गाचे काम फडणवीसांच्या हस्ते सुरु झाले. त्यांनीच ९४४ कोटी निधी मंजूर केला या मार्गाचे काम कधी पूर्ण होणार? ४७३८ कोटी खर्चाच्या मेट्रो १२ म्हणजेच कल्याण तळोजा मेट्रोच्या कामाचा विसर पडला नाही ना?," असा सवाल त्यांनी केला. ८४१६ कोटी खर्चाच्या मेट्रो ५ म्हणजेच भिवंडी कल्याण मेट्रोचे काम प्रगतीपथावर केव्हा ? एमएमआरडीएच्या माध्यमातून ४७२ कोटी निधीतून केडीएमसी क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांचे काम दीड वर्षांपासून प्रलंबित का ठेवले आहे? असा सवालही चव्हाण यांनी यावेळी केला.
उत्तराची अपेक्षा नाही
केडीएमसी क्षेत्रातील दुचाकीस्वारांना रस्त्यांवरील खड्ड्यात पडून जीव गमावले आहेत त्यामुळे रस्त्यांचे काम प्रलंबित ठेवून अजून किती जीव धोक्यात टाकणार आहात? अर्धवट अवस्थेतील जोशी हायस्कुल पुलाचे लोकार्पण आपल्याच हस्ते झाले. ठाकुर्ली ९० फुटी रस्त्याला उन्नत मार्गाने जोडणाऱ्या प्रकल्पाला ३० कोटी निधी मंजूर कधी करणार? मोठागाव रेल्वे क्रॉसिंगच्या डीएफसीसी पुलाच्या ५० कोटी खर्चापैकी २५ कोटीचा भार एमएमआरडीएने करण्याबाबत अडचण कोण सोडवणार? कल्याण तालुक्यासाठी महत्वाचे असे टिटवाळ्यात मेडिकल कॉलेजकरिता जागा अधिग्रहित करण्याचे काम कधी करणार ? अंतिमतः उत्तराची अपेक्षा ठेवत नाही. कामे पूर्णपणे पार पडली म्हणजे झाले असा टोलाही चव्हाण यांनी शिंदे यांना लगावला.