पंकज पाटील, अंबरनाथ: अंबरनाथ एमआयडीसीत अपघातांचे सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी रात्री लग्नावरून परतणाऱ्या दुचाकीवरील परिवाराला एका टेम्पोने धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अंबरनाथमध्ये राहणारे सोमनाथ भंगारे हे आपल्या कुटुंबासोबत पनवेलला लग्न समारंभासाठी गेले होते. तिथून दुचाकीवर परतत असताना अंबरनाथ एमआयडीसीत एका टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सोमनाथ भंगारे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मालू भंगारे आणि तुलसी भंगारे हे दोघे गंभीर जखमी झाले.
या सर्वांना तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले. तिथे मालू आणि तुलसी भंगारे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना उपचारांसाठी थेट मुंबईला हलवण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी घाव घेत तपासाला सुरुवात केली. दरम्यान, अंबरनाथ एमआयडीसीत गेल्या चार दिवसात झालेला हा दुसरा मोठा अपघात आहे. यापूर्वी ३० एप्रिल रोजी एका टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एमआयडीसी भागात वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाली आहे.