कल्याण : कल्याण स्थानकापासून जिल्हा सत्र न्यायालय हाकेच्या अंतरावर आहे. हे न्यायालय सगळ्यांसाठी सोयीचे असताना कल्याण पश्चिमेतील बारावे येथे हलविण्याचा घाट घालण्यात येत आहे. न्यायालय बारावेला हलविण्यामागे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या जागेवर कोणाचा डोळा आहे, अशीही चर्चा सुरू आहे.
सध्या अस्तित्वात असलेले जिल्हा सत्र न्यायालय बारावे येथे हलविण्यास कल्याण जिल्हा वकील संस्थेच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. वकील संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जगताप आणि सचिव चंद्रकांत वाघमारे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे त्यांनी न्यायालय बारावेला हलविण्यात येऊ नये, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे.
जिल्हा सत्र न्यायालयाच्या जागेत ब्रिटिशकालीन इमारत, १९७२ साली बांधलेली इमारत आणि गेल्या आठ वर्षांपूर्वी बांधलेल्या जलदगती न्यायालयाच्या इमारतीत कामकाज चालते. पाच तालुक्यांशी संबंधित खटले आणि कर्जत, कसाऱ्यापासून याठिकाणी पक्षकार न्यायासाठी येतात. त्यांचे दावे दाखल आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या न्यायालयाची जागा १९ गुंठे आहे. याठिकाणी ३० ते ३५ मजली इमारत उभी केली जाऊ शकते. या ठिकाणी जलदगती न्यायालयाची इमारत तशीच ठेवून जुन्या इमारती पाडून नव्याने इमारती तयार करण्याचे प्रस्तावित आहे; मात्र पालिकेने या जागेवर वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
वाहनतळाची गरज काय?स्मार्ट सिटी विकास प्रकल्पांतर्गत सहा मजली मल्टी माॅडेल वाहनतळ विकसित केले आहे. त्याठिकाणी पार्किंग सुरू केले आहे. मग आणखीन वाहनतळाची गरज काय? असा प्रश्न याचिकाकर्त्यांनी केला आहे. न्यायालय बारावेच्या साडेतीन एकर जागेत हलविण्याचा प्रस्ताव आहे.
७०० वकिलांची स्वाक्षरीन्यायालय अन्य ठिकाणी हलविण्यास विरुद्ध करत ७०० वकिलांनी स्वाक्षरीनिशी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहिले आहे. आहे त्या जागेत न्यायालयाच्या इमारतीचा विकास करण्याची मागणी केली आहे.