कल्याण: कर्नाटक विधानसभेत काँग्रेसला मिळालेले यश हे भारत जोडो यात्रेचा परिणाम आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये दिली होती. यावर घरात बसून स्वप्न बघणारे स्वप्नातल्या प्रतिक्रिया देतात, अशी टीका आशिष शेलार यांनी केली होती. त्याला आता राज यांनी कल्याणमध्ये जोरदार प्रत्युत्तर दिले.
मुळात अशा गोष्टी त्यांना सुचतात जे निवडणुका आल्या की, नाक्यावर सभा घेतात, अशी टीका ठाकरे यांनी शेलार यांचे नाव न घेता केली. भारत जोडो यात्रेचा परिणाम कर्नाटकाच्या विजयात झाला, हे तुम्ही मोठ्या मनाने मान्य केलेच पाहिजे. आपण एखाद्या पराभवानंतर काय बोध घेतो, आपल्याला तो घ्यायचाच नसेल तर वागा तसेच, असं राज ठाकरे म्हणाले.
ते पुढे म्हणतात, ज्यांची पोच नाही, त्यांना अशा गोष्टी सूचतात. मुळात यांचं अस्तित्व हे नरेंद्र मोदींमुळे आहे. त्यांना खाली कोण ओळखतो, असंदेखील ठाकरे यावेळी म्हणाले. कल्याणमधील गटबाजी बाबत त्यांना विचारणा केली असता कल्याणमध्ये पक्षात कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही, एकवेळ मतभेद असतील याकडे त्यांनी लक्ष वेधले.
काय म्हणाले आशिष शेलार?मुंबईत माध्यमांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, 'कर्नाटकमध्ये राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव असेल, तर मग जालंधरमध्ये आम आदमी पक्षाचा विजय आणि काँग्रेसचा पराभव का झाला? उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही भाजपाला घवघवीत यश मिळालं, तिथे ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव नव्हता का? यावर राज ठाकरे बोलतील का? राज ठाकरे हे केवळ स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी प्रतिक्रिया देतात. घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो. आम्ही त्यांच्या प्रतिक्रियेला फार महत्त्व देत नाही,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली.