कल्याण : कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी काल रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी करुन शिवसेनेवर आरोप केले. मात्र मनसेचे नगरसेवक कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत मौन का बाळगून होते, असा प्रतिसवाल शिवसेनेजे उप जिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनावर मनसेचा वचक असताना तर त्यांच्या आमदारांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती अशी खोचक टीकाही कदम यांनी केली आहे.
2010 साली मनसेचे 28 नगरसेवक महापालिकेत निवडून आले. त्यानंतर 2015 साली मनसेचे 9 नगरसेवक निवडून आले. गेल्या दहा वर्षाच्या कालावधी महापालिकेत मनसे हा सर्वात मोठा विरोधी पक्ष होता. विरोधी पक्ष नेते पदही मनसेकडे होते. त्यांचा महापालिकेच्या प्रशासनावर वचक असायला हवा होता. त्यांनी तो दबदबा निर्माण केला नाही. महापालिकेच्या स्थायी समितीतही मनसेचे नगरसेवक होते. मनसेचे पदाधिकारी रस्त्यावर उतरून प्रखरपणे आंदोलने करीत असता मनसेचे नगरसेवक महासभेत मौन बाळगून होते. त्यामुळे गेल्या 8 वर्षात रस्त्यावरील खड्डे बुजविण्यावर 114 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या मुद्यावर त्या त्या वेळीच मनसेने त्यांचा प्रखर विरोध का केला नाही असा प्रश्न कदम यांनी यांनी उपस्थित केला आहे.
रस्त्यावरील खड्डे डांबराने बुजविले गेल्यास पावसात ते नीट बुजले जात नाही. ते टिकाऊ होत नाही. ही साधी सोपी गोष्ट लोकप्रतिनिधींना समजत नाही याकडे कदम यांनी लक्ष वेधले आहे. पावसाने विश्रंती घेतल्यावर प्रशासनाकडून रस्ते दुरुस्तीची कामे केली जाणारच आहेत. मात्र मनसेच्या नगरसेवकांनी महासभेत प्रश्न मांडण्याऐवजी वैयक्तिक फायद्याची राजकारण करीत बसले. पक्षासाठी काम केले असते तर ही वेळ आली नसती असे कदम यांनी सांगितले.