लोकमत न्यूज नेटवर्क, बदलापूर : बदलापूरमधील एका सोसायटीत जादूटोण्याचा प्रकार केला जात असल्याचा आरोप रहिवासी महिलेने केला आहे. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज सादर करत तिने बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.
बदलापूरच्या बेलवली परिसरातील वैभव हिल्स सोसायटीत हा प्रकार घडला असून याच सोसायटीत रीना सानप कुटुंबीयांसह राहतात. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याच बाजूला राहणारी महिला अनेक दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणास्तव सानप यांच्या दारासमोर, कॉमन पॅसेजमध्ये, तसेच सानप यांनी घराबाहेर ठेवलेल्या चप्पल-बुटांवर कचरा, हळद, लिंबू-मिरची, बिब्बा टाकते. यातून ही महिला जादूटोणा करत असल्याचा सानप यांचा आरोप आहे.
ही घटना सीसीटीव्हीत ही कैद झाली असून याबाबत विचारणा केली असता अंगावर धावून येणे, शिवीगाळ करणे असा प्रकार या महिलेकडून केला जात असल्याचा सानप कुटुंबीयांचा आरोप आहे.
पोलिसांत केला अर्ज
याप्रकरणी सानप यांनी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. दरम्यान, पोलिसांनी याबाबत दोन्ही कुटुंबांना समोरासमोर बसवून समज दिली असून हा जादूटोण्याचा प्रकार नसल्याचा दावा बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल थोरवे यांनी केला आहे. बदलापूरसारख्या शहरातील शिक्षित भागात असलेल्या गृहनिर्माण संस्थेमध्ये जादूटोण्याचा प्रकार घडल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.