कल्याण : महिलांच्या डब्यात बसून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशी महिलांच्या पर्समधून मोबाईल चोरी करणाऱ्या अश्विनी भंडारी उर्फ प्रियांका करण कुशवाह (२३, रा. आसनगाव) या महिलेला कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचने अटक केली आहे. तिच्याकडून नऊ गुन्ह्याची उकल करत आतापर्यंत बारा मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
आसनगाव ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान लोकलच्या महिला डब्यात महिला प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त वाढवली होती. रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी रेल्वे स्थानक आणि रेल्वे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच सुगावा लागत नव्हता.
आसनगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे क्राईम ब्रांचची गस्त सुरु असताना एक संशयित महिला फिरताना आढळली. पोलिसांचा संशय बळावल्याने पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेत चौकशी सुरु केली. सुरुवातीला महिलेने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे, पोलिसांचा संशय बळावला. पोलीस खाक्या दाखवताच अश्विनीने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.
गेल्या वर्षभरापासून आसनगाव ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान महिला प्रवाशांचे मोबाईल अश्विनी चोरी करत होती. तिच्याकडून आतापर्यंत कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानकावर घडलेल्या नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. तिच्याकडून चोरी केलेले बारा महागडे मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.