लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण:कल्याण-मुरबाड-नगर मार्गावरील शहाड उड्डाणपुलावर कल्याण दिशेकडील उतारावर एका टॅंकरची धडक दुचाकीला बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा टँकरच्या मागील चाकाखाली चिरडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी २.३० च्या सुमारास घडली. कविता म्हात्रे (वय ३०) असे या महिलेचे नाव असून टँकरचालकाला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे.
कल्याण-मुरबाड-नगर हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावरून मोठया प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ दिवस-रात्र सुरू असते. कविता ही म्हारळ याठिकाणी वास्तव्याला होती तर कल्याण पुर्वेतील टाटा नाका येथील पेट्रोल पंपावर कामाला होती. म्हारळ येथून दुपारी कामावर दुचाकीवरून ती जात होती. ती शहाड उड्डाणपुलावरून जात असताना उतारावर असताना तीच्या दुचाकीला पाठीमागील टँकरच्या एका बाजूची धडक बसली. यात कविता दुचाकीसह खाली कोसळली आणि त्याच मागून येणा-या टँकरच्या मागील चाकाखाली ती सापडून यात तीचा घटनास्थळीच दुर्देवी मृत्यू झाला.
या दुर्देवी घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहीती मिळताच महात्मा फुले चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्याठिकाणी अपघात घडला त्याठिकाणचे सीसीटिव्ही फु टेज पोलिसांनी तपासले असताना त्यात दुचाकीला टँकरची धडक बसल्याचे दिसत आहे. टँकरचालकाला अटक केली असून कविताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहीती महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांनी दिली.