डोंबिवली: महिलांनी कारण देण्याची सवय सोडून द्यावी, आणि जिथे गरज पडेल तिथे स्वताला झोकून देऊन सिद्ध करावे लागेल. कुटुंबात देखील सगळ्या नातेवाईकाना जोडून ठेवून घर एकत्र बांधून ठेवण्याची कला ही महिलांमध्ये असते. एकत्र कुटुंब राखणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी थोडं मन मोठं करून सगळ्यांना विश्वासात घेऊन दिलासा देणे आणि सुखदुःख वाटून घेण्याची सकारात्मक प्रवृत्ती वाढीस लागायला हवी असे मत ब्राह्मण महासंघ, डोंबिवलीचे अध्यक्ष मानस पिंगळे यांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनानिमित्ताने ब्राह्मण महासंघ डोंबिवली आणि संलग्न संस्था ह्यांच्या संयुक्त विद्यमाने समाजाच्या विविध क्षेत्रातील सहा कर्तृत्ववान महिलांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. रजनी वीरकर, रेखा नातू, रेखा काळे, हेमांगी बोडस, अस्मिता देशपांडे, अनिता भुजबळ या मान्यवरांचा त्यात समावेश होता. तो समारंभ कार्यक्रम रविवारी ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, डोंबिवली पश्चिम येथे पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ह्या प्रख्यात निवेदिका दीपाली केळकर ह्या होत्या. त्यांनी महिला शक्ती ह्या विषयी निवेदन दिले. यात कार्यक्रम यशस्वी करण्यात माधुरी जोशी, वैशाली कोरडे, सारंगी जोगळेकर, विद्या भिडे, मनीषा धोपटकर, निलिमा चिंचणकर, अनुराधा कुलकर्णी आणि सर्व संलग्न संस्थांच्या महिला प्रतिनिधी ह्यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी येल्लापूरकर यांनी केले. प्रमुख पाहुण्या केळकर ह्यांच्या हस्ते कतृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. एका सराफ व्यावसायिक संस्थेचे उमेश स्थूळ हे मान्यवर म्हणून उपस्थित होते. तसेच सुप्रिया बेहरे, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन संस्थेचे अध्यक्ष प्रदीप जोशी, सुधीर बर्डे, मधुकर भागवत, गौरी कुंटे,यतीन पाठक, ब्राह्मण सभेच्या कार्याध्यक्षा सुचेता पिंगळे, महासंघाच्या कार्यवाह अनघा बोन्द्र, शंतनू पुराणिक, देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे कार्यवाह नरेश कुलकर्णी अन्य मान्यवर, महिला नागरिक उपस्थित होते