डोंबिवली: एमआयडीसी मधील मिलापनगर मध्ये काही वयस्कर महीला सायकल शिकण्याचे धडे गिरवित आहेत. हा उपक्रम सौ. सुवर्णा राणे ( 62 ), सरोज विश्वामित्रे ( 75 ) आणि हर्षल सरोदे ( 48 ) या महिलांच्या माध्यमांतून होत आहे. या महिलांना सायकलपटू गोल्ड मेडालिस्ट हर्षल सरोदे ही विनामूल्य सायकल शिकवीत असून यात लहान मुलीमुले ते वयाच्या 75 वर्षापर्यंत महिला सायकल शिकत आहेत.
या उपक्रम चालू करणाऱ्या महिलांना काही सायकली दान स्वरूपात मिळाल्या असून त्या त्यांनी दुरुस्ती करून घेतल्या आहेत. या उपक्रमासाठी अजून नवीन/जुन्या सायकल आणि हेल्मेट याची आवश्यकता असल्याने ज्यांना या उपक्रमासाठी मदत करायची आहे त्यांनी खालील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. आतापर्यंत तीस पेक्षा जास्त जणांनी सायकल शिकून घेतल्या नंतर ते सर्व सायकल चालविण्यास तरबेज झाले आहेत. सुवर्णा राणे, सरोज विश्वामित्रे यांच्या बरोबर श्रीमती उज्वला कांबळे 67, सौ.स्मिता पाठक 66 , कल्पना बोंडे 56 , किशोरी कोलेकर 51 , दीपा नाईक 43 अशा अनेक महिलांनी आणि लहान मुलामुलींनी आतापर्यंत सायकल शिकून घेतल्या आहेत.
या उपक्रमामुळे व्यायाम बरोबर पर्यावरण आणि चांगले आरोग्य राखण्यात मदत होत आहे. या उपक्रमाचे सर्व थरातून कौतुक होत असून ज्या वयस्कर महिलांना आणि लहान मुलांना यात सायकल शिकण्यासाठी सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुवर्णा राणे आणि हर्षल सरोदे यांना संपर्क साधावा असे आवाहन रहिवासी राजू नलावडे यांनी केले.