कल्याण : आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनीच्या कामगारांची देणी थकीत असताना कंपनीच्या कामगार वसाहतीमध्ये सुरू असलेल्या पाडकामाला गेल्या महिन्याभरापासून कामगारांचा विरोध आहे. हे पाडकाम स्थगित करण्याची कामगारांची मागणी आहे. मात्र ही मागणी दुर्लक्षित केली जात असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी गुरुवारी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करून कंपनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.कंपनीच्या जवळपास साडेचार हजार कामगारांची देणी थकीत आहेत. कंपनी २००९ सालापासून बंद आहे. कंपनीच्या जागा विक्रीबाबत वाद आहे. तसेच कंपनीचा थकबाकी देण्याचा प्रश्न राष्ट्रीय त्रिपक्षीय कंपनी लवादाच्या दिल्ली कार्यालयात प्रलंबित आहे. कंपनीच्या कामगारांनी जवळपास १६०० कोटींची थकीत देणी देण्याचे दावे केले आहेत. या पार्श्वभूमीवर अदानी ग्रुपने कंपनीची जागा खरेदी केल्याचे सांगण्यात येत आहे. जागा विक्रीतून कंपनी कामगारांची देणी देणार आहे. मात्र याविषयी सुस्पष्टता नाही. अदानीने जागा घेतली आहे तर त्याचा करार कामगारांना दाखविला पाहिजे. तो करार न दाखविताच कंपनीने कामगार वसाहतीचे पाडकाम सुरू केले आहे. त्याला गेल्या महिन्याभरापासून कामगारांचा विरोध आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कामगारांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे संतप्त महिलांनी कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ गुरुवारी सायंकाळी ठिय्या आंदोलनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन महिलांना आंदोलन करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी महिला व पोलीस यांच्यात वाद झाला.
एनआरसीतील पाडकामाविरुद्ध महिलांचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 12:08 AM