कल्याण : पत्रीपुलाचा गर्डर टाकला असला तरी त्याचा पोहोच (ॲप्रोच) रस्ता रखडला आहे. या रस्त्याचे काम न झाल्यास वाहतूककोंडी सुटणार नाही, याकडे मनसे आमदार राजू पाटील यांनी लक्ष वेधले होते. मात्र, या रस्त्याचे काम मंगळवारी सुरू झाले आहे. दरम्यान, या रस्त्याचे काम होणारच होते, त्यासाठी आंदोलनाची गरज नव्हती, असा टोला शिवसेनेने मनसेला लगावला आहे.
पत्रीपूल ते ठाकुर्ली या रेल्वे मार्गाला समांतर असलेल्या रस्त्याचे काम झाले आहे. मात्र, पत्रीपुलाला जोडणाऱ्या पोहोच रस्त्याचे १०० मीटर काम सहा वर्षांपासून रखडले होते. पत्रीपुलाच्या गर्डर टाकण्याच्या पहिल्याच दिवशी आ. पाटील यांनी या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी सोमवारी केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. अखेर, या रस्त्याचे काम मंगळवारपासून सुरू झाले आहे.
दरम्यान, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पोहोच रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावले जाईल, हे २१ नोव्हेंबरला स्पष्ट केले आहे, अशी माहिती परिवहन समिती सभापती व शिवसेना पदाधिकारी मनोज चौधरी यांनी दिली. तांत्रिक अडचणींमुळे रस्त्याचे काम रखडले होते. हे काम होणारच होते, त्यासाठी मनसेने आंदोलन करण्याची गरज नव्हती. पत्रीपुलाच्या कामाचे श्रेय घेता आले नाही, त्यासाठी मनसेने आंदोलन केले, असा टोला चौधरी यांनी लगावला आहे.
पोहोच रस्त्याचे १०० मीटरचे काम रखडले होते. नगररचना विभागाने रस्त्याच्या कामांसाठी सीमांकन दिले आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी लक्ष घालून तो तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मंगळवारपासून कामाला सुरुवात केली आहे. हा रस्ता पत्रीपुलाला लवकरच जोडला जाईल. - जगदीश कोरे, कार्यकारी अभियंता, केडीएमसी