लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-ठाकुर्ली रेल्वेमार्गाला समांतर असलेल्या व पत्रीपुलाला जोडणाऱ्या पोहोच रस्त्याचे काम पूर्ण होत आले आहे. मागील पाच वर्षे रखडलेल्या या १०० मीटर रस्त्याचे काम आठवडाभरात पूर्ण होईल, अशी माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.सूर्यवंशी यांनी बुधवारी या रस्त्याची पाहणी केली. याप्रसंगी साहाय्यक संचालक नगररचनाकार मा. द. राठोड, शहर अभियंत्या सपना कोळी-देवनपल्ली, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे उपस्थित होते. ठाकुर्लीतील म्हसोबानगर ते पत्रीपुलापर्यंत २.२ किलोमीटर लांब व २४ मीटर रुंद रेल्वे समांतर रस्ता आहे. त्यापैकी १०० मीटर रस्त्याचे काम भूसंपादनाअभावी रखडले होते.
पत्रीपुलाचा ७०० टन वजनाचा गर्डर टाकण्याच्या दिवशी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पोहोच रस्ता झालाच नाही, तर पत्रीपुलाचे काम पूर्ण होऊन उपयोग नाही. त्यामुळे आधी हा रस्ता पूर्ण करा, अशी मागणी केली होती. आयुक्तांच्या भेटीदरम्यान पाटील यांनी रस्तेबाधितांना न्याय देण्याचीही मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेचे परिवहन सभापती मनोज चौधरी यांनी पोहोच रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याचे स्पष्ट करीत युद्धपातळीवर ते पूर्ण केले जाईल, असे सांगितले होते. पत्रीपुलाच्या कामाची पाहणी दोन दिवसांपूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्या वेळी काम अंतिम टप्प्यात असून, पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होईल, असे स्पष्ट केले होते.
वेळ, इंधनाची होणार बचतपत्रीपुलाच्या पोहोच रस्त्याच्या कामाची पाहणी सूर्यवंशी यांनी बुधवारी केली. या वेळी त्यांनी हा रस्ता आठवडाभरात पूर्ण होईल. त्यामुळे या रस्त्याद्वारे कल्याण-डोंबिवलीला ठाकुर्लीतील रेल्वे समांतरमार्गे प्रवास करता येईल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ व इंधनाचीही बचत होईल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.