कल्याण : केडीएमसीतील २७ गावांमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने त्यांच्या डागडुजीसाठी स्थानिक नगरसेवक कुणाल पाटील यांनी सरकार दरबारी पाठपुरावा केला आहे. पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या खर्चातून नागरिकांना सुविधा देण्याच्या निश्चय केला आहे. त्याचाच भाग म्हणून स्वखर्चाने त्यांनी विजय पाटील नगर फेज ३ गोळवली-आडीवली रोड ते टेकडी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू केले आहे.
विजय पाटील नगर फेज ३ गोळवली आडिवली रोड ते टेकडी रस्त्यावर सततचे होणारे वाहनांचे अपघात व परिसरातील धुळीचे साम्राज्य यातून वाहनचालक व नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. ३१ डिसेंबरला उद्योजक अनिल पाटील, महेंद्र तरे, उद्योजक राम जाधव, उद्योजक केशव भाने यांच्या उपस्थितीत या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला सुरुवात झाली आहे.
यावेळी शिवसागर यादव, योगेश खराटे, नालीत खान, सुनील राणे, विकास रांजणे, गणेश पाटील पाटील, जीवन निभाळकर, राजलक्ष्मी हलदार, अनुजा परब, अश्विनी खराटे, शीतल मांगले, नीलम तिवारी, रंजना शुक्ला, सावित्री पासी आदी उपस्थित होते. दरम्यान, पाटील यांचा लवकरच वाढदिवस आहे. मात्र, नागरिकांना होणारा त्रास आणि कोरोनाची महामारी यामध्ये वाढदिवस साजरा करण्यापेक्षा जनसामान्यांमध्ये राहून काम करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.