कल्याण - ऐका सत्यनारायणाची कथा, पाऊले चालती पंढरीची वाट, चल ग सखे पंढरीला, बाप्पा मोरया रे, उड जायेगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली अशी शेकडो भक्तीगीत, भावगीत, कव्वाली, कोळीगीत गाऊन आपल्या गायकीचा वेगळा ठसा उमटविणा-या शिंदे यांची गाणी आजही रसिकांच्या हदयात घर करून आहेत. कल्याणच्या रहिवाशी असलेल्या या महाराष्ट्राच्या लोकगायकाची 23 जून 2003 ला प्राणज्योत मालवली. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांचे भव्य स्मारक उभे रहावे असा ठराव 16 जुलै 2004 ला मनपाच्या महासभेत करण्यात आला.
मात्र तब्बल चार वर्षानी या स्मारकाच्या भुमीपूजनाला मुहूर्त मिळाला. शहरापासून 5 ते 6 कि.मी अंतरावरील कोळवली येथे उभारलेल्या या स्मारकाचे काम आजच्याघडीला देखील अपुर्णच आहे. 2010 च्या महापालिका निवडणुकीच्या आधी या कामाचे श्रेय लाटण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेकडून घाईघाईत अर्धवट स्थितीतील स्मारकाचे लोकार्पण करून एकप्रकारे या लोकगायकाच्या स्मारकाची थट्टा केली. स्मारकाच्या ठिकाणी शिंदे यांचा पुतळा उभारून बाजुकडील संरक्षक भिंतींना रंगरंगोटी करून घाईत लोकार्पण उरकण्यात आले.
दरम्यान प्रस्तावित कामांबाबत सत्ताधा-यांचे पुरते दुर्लक्ष झाले असताना विरोधी पक्षही निद्रावस्थेत राहीला. सद्यस्थिती पाहता ख-या अर्थाने या लोकगायकाची उपेक्षा झाल्याचे पहावयास मिळते. स्मारकाच्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात नाहीत. याठिकाणची शोभेची झाड पाण्याअभावी पुर्णपणे सुकून गेली. त्याची जागा दारूच्या बाटल्या, सिगारेट-पानमसाल्याच्या पाकिटांनी घेतली आहे. पुरेशी वीज ही नाही. अक्षरश: हा स्मारकाचा परिसर दारू डयांचा आणि धुम्रपान करणा-यांचा अड्डा बनलाय.
स्मारकाच्या ठिकाणी प्रस्तावित असलेली कामे आजही पुर्णत्वाला आलेली नाहीत त्यामुळे भूमीपूजनाचा घाट घालताना जितकी तत्परता दाखवली. जाते तितकीच तत्परता स्मारकाच काम पूर्ण होत की नाही ते कोणत्या अवस्थेत आहे याबाबत का दाखवले जात नाही असा प्रश्न निर्माण झालाय.