कल्याण-गेल्या तीन दिवसापासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावर खड्डे पडले आहे. कल्याण मलंग रस्त्यावरील खड्डयात पडून तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाचे नाव सागर राठोड असे आहे. त्याच्या नाक, ओठासह डोळ्य़ाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सागर हा कोळेगावचा रहिवासी आहे. तो विद्यार्थी आहे. 19 जुलै रोजी तो रात्री 9 वाजता दुचाकीवरुन कल्याण मलंग रस्त्याने घरी परतत होता. मलंग रोडवरील काकाचा ढाब्यासमोर असलेल्या दीड फूट खोल खड्डय़ात त्याची दुचाकी आदळून झालेल्या अपघातात सागर रस्त्यावर पडला. त्याला जखमी अवस्थेत पाहून नागरीकांनी त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सागरचे वडिल रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्याच्या घरी तो, त्याची आई,भाऊ आणि वडिल असा परिवार आहे. त्याची परिस्थिती बेताचीच आहे. त्याच्यावरील उपचाराचा खर्च कुणाल पाटील फाऊंडेशनने उचलला आहे. त्यावर उपचार सुरु आहे. रुग्णालयातील डॉक्टर पवन सैनी यांनी सांगितले की, सागरला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या नाक, ओठ आणि डोळ्य़ाला टाके मारावे लागले आहेत. आत्ता त्याची प्रकृती स्थित आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेमुळे रस्त्यावरील खड्डय़ांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रस्त्यावरील खड्डे आत्ता जीवघेणो ठरू लागले आहेत. काही दिवसापूर्वी कल्याण गांधारी रोडवर दिव्या कटारिया या महिलेचा रस्त्यावरील खड्डा चुकविताना मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ती तिच्या दिरासोबत दुचाकीवरुन चालली होती.