कल्याण : पश्चिमेतील खडकपाडा ते अमृतपार्कदरम्यानच्या काँक्रिट रस्त्यावरील गॅपमुळे एका तरुणीच्या दुचाकीला गुरुवारी सकाळी ९.३० वाजता अपघात झाला. त्यात तरुणीच्या नाकातोंडाला दुखापत झाली. दरम्यान, गॅप न भरल्यास मोठा अपघात होऊन एखाद्याचा जीव जाऊ शकतो, याकडे जागरूक नागरिकाने केडीएमसीचे लक्ष वेधले आहे.
रस्तेदुरुस्ती, खड्डे भरणे, यासाठी योगेश दळवी हे नेहमी प्रशासनाकडे पाठपुरावा करतात. दुभाजक, अर्धवट कामे याकडे सातत्याने सोशल मीडियाद्वारे ते प्रशासनाचे लक्ष वेधतात. शुक्रवारचा अपघात पाहताच त्यांनी ही बाब केडीएमसी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. आता तरी प्रशासन जागे होणार का, असा सवाल त्यांनी केला आहे.
दळवी म्हणाले, ‘२०१८ मध्ये खड्ड्यांमुळे केडीएमसी हद्दीत पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी एक घटना शिवाजी चौकात घडली होती. त्यात रस्त्यावरील गॅपमध्ये दुचाकी आदळून पडल्याने एका मुलाचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर राज्य रस्ते विकास महामंडळ व केडीएमसीला जाग आली होती. मात्र, आजही अनेक ठिकाणी रस्ते उंचसखल आहेत. काँक्रिट, डांबर, पेव्हरब्लॉक व जमीन यामध्ये गॅप आहे.’दरम्यान, ‘एफ’ केबिन येथील रस्ता नुकताच वाहतुकीसाठी घाईगडबडीत खुला करण्यात आला. या रस्त्याच्या दुतर्फा गटाराचे काम सुरू आहे. पेव्हरब्लॉक बसवणे बाकी आहे. तरीही रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्याने अपघाताची शक्यता आहे.