- मयुरी चव्हाण
कल्याण: संकट कोणतंही असो... कोणत्याही यंत्रणांच्या अखत्यारितलं असो... सर्वात आधी धावून जाते ती माणुसकीची यंत्रणा... अर्थात असं नेहमी बोललं जातं की चांगली माणस आहेत म्हणूनच माणुसकी अजून जिवंत आहे.. याचाच प्रत्यय आज कल्याणमध्ये आला.. कल्याण डोंबिवली शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. मदतकार्य सुरू होतं आणि या सर्व कठीण परिस्थितीत कल्याणमधील खरे कुटुंब दुधाच्या शोधात होतं. घरातील दोन चिमुकल्या बाळांना भूक लागली होती. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेनुसार त्यांना आईच दूधही द्यायचं नव्हतं. त्यामुळे खरे कुटुंबियांची दुधासाठी शोधाशोध सुरू झाली. बाहेर पाणी आणि घरात चिमुकल्यांच्या भुकेची काळजी. जवळची दुकान बंद होती. दूध न मिळाल्यानं चिमुकली रडू लागली. त्यांच्या रडण्याचा आवाज कल्याणमधील युवकांच्या कानी पडला आणि क्षणाचाही विलंब न करता ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कोणतंही वाहन उपलब्ध होत नसताना, कमरेभर पाण्यातून वाट काढत ते दूध घेऊन खरे कुटुंबियापर्यंत पोहचले आणि अखेर चिमुकल्याचा आजोबांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.
कल्याण नजीक असलेल्या शहाड परिसरातील साई धाम सोसायटीत राहणाऱ्या खरे कुटुंब राहते. गुरुवारी या परिसरात सुद्धा पाणी साचले होते. घरातील दोन चिमुकल्याना भूक लागली होती. देवांश आणि सारांश हे दोघेही जुळे भाऊ असून नुकतच त्यांना एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यांची आई ईशा खरे यांना एप्रिल महिन्यात कोरोना झाला होता. त्यामुळे तुर्तास आईचे दूध न पाजण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. तसेच मुलांचा काहीसा लवकर जन्म झाला असल्याने त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. गुरुवारी दोघांनाही भूक लागली. घरातील सर्व दूध संपलं. बाहेर पुरजन्य परिस्थिती. त्यात भुकेनं चिमुकल्यांचं रडणं ऐकून आजी आजोबांचा जीवही कासावीस झाला. घरात दुसरं कोणी नाही. वडील गौरव खरे हे सुद्धा पाण्यामुळे बाहेर अडकून बसले होते. अशातच बाळांची आत्या संगीता खरे यांनी कल्याणातील युवक महेश बनकर या तरुणाला मदतीसाठी फोन केला. क्षणाचाही विलंब न लावता दूध घेऊन आधारवाडीहुन शहाडच्या दिशेने निघाले. बिर्ला कॉलेजपासून पुढे पाणी साचल्यानं पायीच वेगवेगळे रस्ते शोधत, पाण्यातून वाट काढत महेश आणि त्याचे मित्र साई धाम सोसायटीत पोहचले आणि दूध बाळांच्या आजोबांकडे सुपूर्द केले. या कठीण परिस्थितीत जीवाची बाजी लावून केवळ दोन लहानग्यांसाठी तरुणांनी केलेली मदत पाहून ते भारावून गेले. महेश आणि त्याच्या मित्रांनी दाखविलेल्या या माणूसकीचे कौतुक होत असून असे तरुण इतर तरूणांसाठीही आदर्श ठरत आहेत.