घरपोच खाद्यपदार्थ पोहोचवणारी झोमॅटो कंपनी प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही कंपनी वेगळ्याच चर्चेत आहे. कारण कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगरमधील रायडर्सनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामध्ये शेकडो रायडर सहभागी झाले. जोपर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे या रायडर्सनी सांगितले आहे. मात्र यामुळे कंपनीच्या सेवेवर परिणाम झाला असून घरबसल्या विविध पदार्थ झटपट ऑर्डर करणाऱ्या खवय्यांचाही हिरमोड झाला आहे.
पेट्रोलच्या दराने आकाशाला गवसणी घातली असून त्याचा सर्वाधिक फटका या रायडर्सच्या उत्पन्नावर बसला आहे. प्रत्येक ऑर्डरच्या डिलिव्हरीसाठी कंपनीकडून देण्यात येणारे कमिशन आणि ती ओर्डर पोचवण्यासाठी येणारा खर्च यामध्ये मोठी तफावत आली आहे. त्याचा परिणाम कंपनीकडून मिळणाऱ्या आमच्या कमिशनवर झाला असून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नात आम्ही घर कसे चालवायचे असा सवाल या रायडर्सनी उपस्थित केला आहे.
तर कंपनीकडून देण्यात येणारी आठवड्याची सुविधा सुरू ठेवावी, रात्रीच्या वेळी दूरच्या ऑर्डर देताना कंपनीने नियोजन करावे, दूर अंतराच्या ऑर्डर कमी करावे, शहरांतर्गत ऑर्डर स्थानिक रायडरलाच मिळाव्यात, टीम लीडरकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही, कंपनीकडून मिळणारे मिनिमम गॅरंटी पे पुन्हा सुरू करावे यांसारख्या विविध मागण्यांसाठी या रायडर्सनी आंदोलन सुरू केले आहे.