लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक उपायांची अंमलबजावणी न करणाऱ्या १८८१ जणांवर कारवाई करत विविध ग्रामपंचायतींनी १ लाख ८४ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी रुमाल किंवा मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, दुकानदार, व्यावसायिक यांनी मास्क, हातमोजे न वापरणे आणि फिरते फळविक्रेते, भाजी फेरीवाले यांनी मास्क व हातमोजे न वापरणे याबद्दल हा दंड करण्यात आला आहे.
गेल्या वर्षीही कोरोनाच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये अशी कारवाई करण्यात आली होती. मात्र, आक्टोबर २०२० नंतर ही कारवाई थंडावली. पुन्हा जानेवारीनंतर कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यामुळे आता जिल्हा परिषदेने दिलेल्या सूचनांनुसार ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरण्याची यामध्ये प्रकरणे सर्वाधिक आहेत.
मास्क न वापरल्यास १०० रुपये, थुंकल्यास ५० रुपये, दुकानदार, व्यावसायिकांनी मास्क, हातमोजे न वापरल्यास २५० रुपये आणि फिरत्या विक्रेत्यांनी मास्क, हातमोजे न वापरल्यास १०० रुपये असे दंडाचे स्वरूप आहे.
चौकट
तालुका प्रकरणे दंड
आजरा १५ १४००
भुदरगड ३४० ३७९००
चंदगड ६२ ४५००
गगनबावडा ३६ ३४००
गडहिंग्लज १९३ १८७००
हातकणंगले २१२ २०३५०
कागल ८० ७८००
करवीर ९४ ८८००
पन्हाळा ५६ १४६५०
राधानगरी ६७ ६१५०
शाहूवाडी ११२ १२९००
शिरोळ ६१४ ४९१००
एकूण १८८१ १ लाख ८४ हजार ८५०
चौकट
आजरा तालुक्यात सर्वाधिक कमी कारवाई
जिल्ह्यातील १२ तालुक्यांत आजरा तालुका कारवाईबाबतीत मागे असल्याचे चित्र आहे. गगनबावडा तालुक्यात केवळ २९ ग्रामपंचायती आहेत. तर तेथे ३६ प्रकरणांमध्ये कारवाई झाली असून ३४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. याउलट आजरा तालुक्यात ७३ ग्रामपंचायती असूनही केवळ १५ कारवाया केल्या असून केवळ १४०० रुपये दंड करण्यात आला आहे. म्हणजेच केवळ कारवाई केल्याचा देखावा केल्याचे स्पष्ट होत आहे.
चौकट
ग्रामसंस्कार वाहिन्या अद्ययावत करा
गावागावातील ग्रामसंस्कार वाहिन्या अद्ययावत करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. आजही अनेक ग्रामपंचायती या ग्रामसंस्कार वाहिन्यांच्या माध्यमातून सार्वजिनक सूचना देत आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ही सेवा अद्ययावत करा, जेणेकरून ग्रामस्थांना एकाच वेळी सूचना देणे सोयीचे होईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.